Tuesday, April 26, 2016

लहान वयात दोनदा एव्हरेस्ट आणि गौरिशंकर चढून गेलेल्या संतोष यादव यांची एक अनौपचारिक मुलाखत वाचत होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांनी माउंटेनिअरिंगमधून ब्रेक घेतला. आता त्या हिमालयात एका गावात लहान मुलांकरता शाळा भरवतात. अगदी साध्या सुध्या आहेत संतोषजी. कोपरापर्यंत ब्लाऊज, सुती साडी, तिचा डोक्यावरुन हरयाणवी पद्धतीने घेतलेला पदर, कपाळावर पिंजरेचं कुंकू वगैरे असं मुलाखतीत लिहिलेलं.
तर त्या सांगत होत्या की मुलांना पर्यावरणाचं रक्षण करायला शिकवायचं असेल तर आधी निसर्गाशी, हिमालयाशी नातं जोडणं शिकवायला हवं. आणि त्याकरता त्यांना स्वत:शी, समाजाशी, नात्यांच्या परिघाशी पक्क बांधणं गरजेचं आहे. आता हे कसं करायचं याचा बराच विचार, प्रयोग केल्यावर  लक्षात आलं की त्याकरता त्यांना आपल्या संस्कृतिशी, धर्माशी जोडून ठेवायला हवं. त्यांच्या मनाला, शरिराला शिस्त शिकवायला हवी. आजच्या काळात, जिथे मोहाची, लक्ष विचलीत होण्याची साधनं मुलांच्या सतत अवती भवती असतात तिथे हे साधता येणं अत्यंत मुश्किल. पण जर धर्मातल्या, संस्कृतीतल्या काही रिच्युअल्स, उदा. पूजापाठ, ध्यानधारणा वगैरे.. त्यांच्या अंगात भिनवल्या गेल्या, तर आपोआप त्यांच्या दिनक्रमाला शिस्त लागते. मनाला शिस्त लागते. ध्यानधारणेमुळे ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण वाढते आणि मग स्टॅमिना, उर्जा वाढते असे बरेच फ़ायदेही होतात. साधारण पारंपरिक हिंदू घरांमधे या रिच्युअल्स रेग्युलर पाळल्या जातात, पण शहरी मुलांना ते शिकवणार घरात कोणी नसतं. म्हणून मग कधीही उठा, कधीही, कसंही जेवा, कधीही झोपा असे प्रकार लहान वयापासून सुरु होतात आणि मग बेशिस्त अंगात भिनते, जी आपल्या आयुष्यातही उतरते.
आता यातलं योग्य-अयोग्य इत्यादीबद्दल वेगळी मतं असू शकतातच.

बाकी धार्मिकता वगैरे जाऊदे. पण मला रिच्युअल्सचं इन जनरल महत्व मात्र हल्ली मनापासुन पटायला लागलय. कर्मकांड शब्दातला धार्मिक संदर्भ बाजूला ठेवला तरी रोजच्या जगण्यात इतरही असतातच ती.
अशा रिच्युअल्स करण्यामुळे आयुष्य सोपं आणि आपल्या ताब्यातलं होतं. ठराविक गोष्टी ठराविक वेळेत उरकल्या एकदा की मग बाकी गोष्टी करायला दिवस मोकळा. गरजेच्या गोष्टीच झाल्या नाहीत असा ताण मग मनावर रहात नाही.
पूर्वी मी ट्रेक, पिकनिकवर गेल्यावरही सकाळी मेडिटेशन वगैरे करणं न चुकवणा-यांचा वैताग करायचे. पण आता आपापल्या दिनक्रमानुसार, गरजेनुसार काही रिच्युअल्स आपल्यात भिनवणं आत्यंतिक गरजेचं आहे हे मला कळलय. मग ते हेल्थ रुटीन असो, ब्यूटी रेजिम असो की वर्क शेड्यूल. रात्री झोपायच्या आधी उद्याच्या कामांची यादी करणे, सकाळी उठल्यावर योगासनं, ब्रिदिंग एक्सरसाईज करणे, वॉक घेणे, ठराविक वेळीच आंघोळ करणे, जेवणे पासून अगदी आठवड्यातून अमुक दिवशी केसांना तेल लावणे, पेडिक्युअर करणे अशी कामे रिच्युअल म्हणून अंगात भिनवून घेतली की निदान अशा कामांनाही (माझ्यासारखी) रिमाइंन्डर्स लावायची गरज रहात नाही.
मात्र रुटीनचं रिच्युअल होण्याकरता कठोर शिस्तीला पर्याय नाहीच. इथे ती मुळातच अंगात नसल्याने हे सगळं अधुन मधुन बारगळतं. अजून पूर्वीपासून सुरुवात करायला हवी होती, जरा आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं या बाबतीत तरी ऐकायला हवं होतं असं वाटत रहातं.
आणि आता यात अजून एक विदारक गंमत अशी की स्वत:त रिच्युअल्स भिनवायचं महत्व कळायलाच इतकं आयुष्य उलटलं, मुलींचं काय? त्यांना कसं हे रिच्युअल्सचं महत्व समजवायचं? ते शक्य नाहीच व्हायचं आमच्याने. आम्हीच मुळात रात्री दीड दोननंतर झोपणार, मग सकाळची कामं दुपारी करणार.. शेड्यूलच्या धज्जियां स्वहस्ते रोज उडवणार.. मुलींना स्वत:हून लवकर अक्कल येवो.
तर आता संतोष यादवजींच्या शाळेमधे या वयातही भरती होता येतय का याची चौकशी करावी असा विचार मनात येतोय.


2 comments:

  1. काय की. सोयीचं होत असणार चिकार. होतंच. पण शिस्त, कर्मकांड, दिनक्रम इत्यादी संज्ञांबद्दल मला चटकन सावरून बसायला होतं. एकूण पैशाचं महत्त्व आणि उपयुक्तता मानतोच आपण. पण त्याला नक्की किती महत्त्व द्यायचं याबद्दल आपापल्या काही ठाम, काही हलत्या, काही धूसर, काही ठळक सीमारेषा असतात आणि त्या आखून घेणं महत्त्वाचं असतं. तसंच मला याही गोष्टींबद्दल होतं. नियम महत्त्वाचे, पण अपवादही महत्त्वाचेच, असं काहीसं.
    ह्म्म. विचारप्रवर्तक पोस्ट आहे.

    ReplyDelete