Sunday, May 1, 2016

रविवारी संजय गांधी नॅशनल पार्कमधे प्रेस्ड फ़्लॉवर वर्कशॉपला गेले होते. बॉटनीची स्टुंडन्ट असल्याने मला हर्बेरियम्स कशी करायची माहित आहे. शिकत असताना बोटॅनिकल एक्सकर्शन्सना गेल्यावर वेगवेगळी फ़ुलं, पानं प्रेस करुन सुकवायचं टेक्निकही माहित झालेलं. नंतर बॉटनीशी संबंध सुटला पण कशी माहित नाही, फ़ुलं सुकवायची सवय कायम राहिली. मधून मधून बुकमार्क, ग्रिटींग करुन मित्र-मैत्रिणींना देण्याकरता त्यांचा उपयोग व्हायचा. पण हा उत्साह फ़ार कमी वेळा येतो. या वर्कशॉपमधे सुकवलेल्या फ़ुलांचं आणखी काही वेगळं, सोपं करायला शिकवतील असं वाटलेलं. तर ते तसं काही फ़ार वेगळं मिळालं नाही शिकायला पण त्या निमित्ताने इतक्या सकाळी (साडेसात वाजता) बोरिवलीच्या जंगलात जायचा अनुभव खूप वर्षांनंतर घेतला. काही वर्षांपूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नेचर ट्रेल्सना खूप वेळा यायचे. लोकं मस्त दुर्बिणी वगैरे घेऊन बर्ड वॉचिंग करत होते, सायकली फ़िरवत होते, व्यायाम चालू होते, काहीजण भल्या पहाटेच जंगलात खोलवर फ़िरुन आता परतत होते. मस्त, उत्साही वातावरण. सगळ्यात सुंदर गुलमोहोर, पळस, काटेसावर, सोनमोहोर, बहावा, आसूपालवचे फ़ुलांनी लगडलेले वृक्ष. अहाहा..  हावरटासारखी पुन्हा खाली गळून पडलेली फ़ुलं, शेंगा, बिया गोळा करुन घेतल्यात. आता वर्कशॉपमधे शिकवलेल्या जरा वेगळ्या टेक्निकने पुन्हा काहीतरी करुन बघायला हवा. अंगात नवा उत्साह भरण्याची निसर्गाची शक्ती अफ़ाट आहे. 

No comments:

Post a Comment