Saturday, January 14, 2017

मेहफ़िल-ए-असीम

काही सुंदर मौके आपणहून तुमचं दार ठोठावतात.
मीरा दातार यांचा फोन आला उर्मिला सिरुर यांचा एक नवा कथासंग्रह पुस्तक मौजने काढला आहे, त्यानिमित्त त्यांच्या मुलीच्या शिवाजी पार्कच्या घरी एक अनौपचारिक कार्यक्रम करतो आहोत, येशील का?
"अर्थातच"- माझं उत्तर त्वरित होतं.

मीरा दातार म्हणजे चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे यांची कन्या. दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टीट्यूटमधे प्रिन्सिपल आहेत, स्वत: अर्थातच चित्रकारही.

उर्मिला सिरुर यांचा या आधीचा, पहिला, कथासंग्रह ’कवडसे’. हा मी सहज निदान वीस वर्षांपूर्वी वाचला होता. फ़ार आवडला होता. स्वत:ची पुस्तके विकत घ्यायला सुरुवात केली होती नुकतीच. गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे या नावांच्या यादीत या लेखीकेची भर पडली. मला जसं वाचायला आवडतं तसंच त्यांनी लिहिलेलं. सुंदर समकालिनता आणि साधी सरळ, कसलंही अवडंबर नसलेली भाषा, कथेचं बीज फ़ुलवत नेण्यातली सहजता.
त्यात एक कथा होती,  एका चित्रकार मुलीचा समोर बसवलेल्या न्यूड मॉडेलवरुन पेंटींग करतानाचा अनुभव वर्णन करणारी. त्या पेंटींग क्लासमधल्या अ‍ॅम्बियन्स, मानसिकता, रंगांचं पॅलेट.. असं सगळं इतकं वास्तव, तरल भाष्य होतं त्यात. मनात ठसली ती कथा. अजून इतरही कथा लक्षात राहिल्या, पण ही जास्त.

तीनेक वर्षांपूर्वी’चिन्ह’च्या ’नग्नता-चित्रातली, मनातली’ विशेषांकाच्या वेळी ’चिन्ह’च्या ब्लॉगवर या कथेच्या आठवणीचा उल्लेख होता. त्यावेळी उर्मिला सिरुर यांचा सतीश नाईकना फोन आला होता, ही कथा अजून कोणाला आठवते याचं त्यांना त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं आणि अर्थातच आनंदही झाला होता.

माझ्याकडचा तो कथासंग्रह नंतर कधीतरी हरवला होता. कोणीतरी वाचायला नेला आणि परत आला नाही.
मधल्या काळात अधून मधून उर्मिला सिरुर नाव दिसायचं. एखाद्या दिवाळी अंकामधे एखादी कथा वाचली जायची, पण एकत्रित वाचलेल्या कथा जास्त परिणामकारकतेनं आणि सलगतेनं लक्षात रहातात,  दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत वाचलेलं नंतर फ़ार आठवत नाही, तसंच या कथांबद्दल झालं.

आता मीराचा फोन आला तेव्हा उर्मिला सिरुर यांना भेटण्याची उत्सुकता वाटली ती त्यांच्या आधीच्या कथांच्या आठवणींमुळे.

उर्मिला सिरुर आता ऐंशीच्या घरात सहज असाव्यात. पण मस्त टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वृत्ती. छानसा चुडीदार घातलेल्या सिरुर लहानशा, तरुण मुलीसारख्याच वाटल्या.
"अगं माझं हे नाव म्हणजे ’बुरखा’ आहे, माहितेय का तुला?" गप्पांची सुरुवातच अशी मजेनी झाली.
इतकं ख-यासारखं वाटणारं टोपण नाव, मला अर्थातच शंकाही का यावी?
माझ्या चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्या मिश्किल हसत म्हणाल्या, "माझ्या ओळखीची एक उर्मिला होती, उंच, सडसडीत बांध्याची, लांब केसांची. माझी उंची लहानशी, मग वाटलं लिहिताना तिचंच नाव घ्यावं. छान वाटलं वेगळ्या नावानी लिहिताना. मोकळेपणानी लिहिता आलं, आणि शिवाय नव-याच्या ओळखीतल्या लोकांना मी माझ्या कथेत घ्यायचे तेव्हा त्यालाही कानकोंडं व्हायला नको असा विचार होता. मग सवयच लागली या बुरख्याची"
मलाही हसायला आलं हे ऐकताना. पण मग ’सिरुर’ हे आडनाव कुठलं?
तर म्हणाल्या.. असंच छान लय वाटली या आडनावाला. शिवाय एक सिरुर नावाचे चित्रकार होते, किर्लोस्कर, स्त्रीमधे त्यांची चित्रं यायची, ती आवडायची. म्हणून घेतलं."
आणि मग एअर इंडियात पायलट असलेल्या आपल्या नव-याला एकदा फ़्लाइटमधे दिलीप चित्रेंनी कशी मिस्टर सिरुर अशी हाक मारली याची आठवण काढून उर्मिला खूप हसतात.

उर्मिला सिरुर यांच्या या नव्या ’असीम’ नावाच्या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर पद्मा सहस्त्रबुद्धेंचं सुंदर पेंटींग आहे. निळ्या, हिरव्या लाटांचा असीम समुद्र.. खूप देखणं दिसतय कव्हरवर.
"पद्मा आणि मी मॉडेल आर्टला एकत्र चित्रकला शिकलो,  तिच्याइतकी सुंदर चित्रं काढणं काही मला जमणार नव्हतं, म्हणून मी मग त्या भानगडीत न पडता असं काहीबाही लिहायला लागले." उर्मिला सिरुर सांगतात, "पहिल्या कथासंग्रहावरचं चित्रं मात्र मीच काढलं होतं." दोघींची छान मैत्री अजूनही आहे.


बाजूच्याच टेबलावर दोन सुंदर शिल्प असतात, आणि एक बस्ट.
"ही आईने बनवली आहेत" किरण सांगते. "आई स्कल्प्टर आहे, पण घरात या सगळ्याचा मोठा पसारा घालणं नकोसं वाटलं तिला, शिवाय आमच्या घरी माणसंही खूप, ये जा सारखी चाले. इथे जवळच रहाते आई. तीन खोल्यांच्या फ़्लॅटमधे स्कल्पचर्सचा सेट अप करणं अवघडच."
किरण मोडक स्वत:ही छान सिरॅमिक आर्टिस्ट आहेत.

आम्ही गप्पा मारत असताना मग इतर निमंत्रितही येतात. मौजेचे संजय भागवत, मोनिका गजेन्द्रगडकर आणि त्यांची आई, रामदास आणि लैलाताई भटकळ, माणिक वालावलकर, नीलम देसाई.. शिवाय उर्मिला सिरुर यांचे जवळचे आप्तस्वकीय, जावई, मित्र-मैत्रीणी.. मग ब-याच गप्पा होतात. ललिता पटवर्धन येऊ शकल्या नसतात त्याबद्दल उर्मिला सिरुरना वाईट वाटतं. राम पटवर्धनांच्या घरी कथांवर कशी छान डिस्कशन्स व्हायची त्याच्या आठवणी निघतात. इतर पुस्तकं, लेखक, चित्रप्रदर्शनं.. छान गप्पा, खाणंपिणं,.  प्रसन्न आणि निवांत संध्याकाळ.

मनस्वीपणे, स्वत:ला हवं ते, हवं तेव्हाच, मोजकं पण दर्जेदार लिहिणारी, कलासक्त वृत्तीची एक आता वयाने परिपक्व झालेली लेखिका, तिच्या लिहिण्याबद्दल, तिच्या बद्दल आस्था बाळगणारे साहित्यिक, कलाप्रेमी वृत्तीची मोजकी पण जवळची माणसं सोबत.. छान रसायन जमून आलं होतं.

उर्मिला सिरुर माझ्या आठवणीत राहिलेल्या ’न्यूड’ कथेबद्दल बोलताना म्हणाल्या, "अगं, मला वाटलेलं, इतका वेगळा, काहीसा धाडसी विषय मांडलाय मी कथेतून.. खूप नाही, पण ब-यापैकी चर्चा होईल, पण फ़ार कोणी बोललच नाही कथेवर, माझ्यापर्यंत तिच्यावरचा प्रतिसाद आलाच नाही."

ती कथा पोचली होती त्यापेक्षाही जास्त हे बोलणं पोचलं एकदम आत्ता माझ्यापर्यंत. पोचलं काय, टोचलंच. लेखकाला आपण जे लिहिलं त्याबद्दल कोणी बोललेलं, त्यावर चर्चा झालेली, बरं-वाईट उच्च्चारलेलं, कौतुक केलेलं, कसं-कधी सुचलं असं काहीबाही विचारलेलं किती मनापासून हवं असतं हे मलाही माहित होतं आता.
आणि वाचक किती आळशी असतो. फ़ार क्वचित तो लेखकापर्यंत पोचतो हेही. मीही त्यापैकीच एक.
मी का नाही तेव्हा, जेव्हा ती कथा इतकी मनापासून आवडली होती तेव्हा जरा धडपड करुन लेखीकेपर्यंत पोचले तिला त्याबद्दल सांगायला?
आता सांगता आलं याबद्दल माझेच आभार मानून टाकते मग मी जिना उतरताना.