Friday, May 3, 2019

झेन सापडतो तेव्हा..



एकदा लक्ष्मण श्रेष्ठांना त्यांच्या स्टुडिओत ते करणार असलेल्या पेंटींगची तयारी करताना पाहिलं होतं. पेंटींग टेबलवरुन आधी अतिशय हलक्या हातांनी त्यांनी एक कोणत्या तरी पक्ष्यांच्या पिसाचा कुंचा फ़िरवला, मग मऊ फ़डक्यानी टेबलाचा पृष्ठभाग पुसून काढला. त्यावर रंगांच्या ट्यूब्ज एकाशेजारी एक मांडून ठेवल्या. ब्रश ठेवलेला व्हास रिकामा करुन त्यातले हवे असलेले ब्रश, नाईफ़ बाजूला काढली, मग बाकीचे पुन्हा एकेक करुन भरुन ठेवले. संथ लयीतल्या हालचाली. स्टुडिओच्या दरवाजाजवळ लहानसा तेलाचा दिवा, वातावरणातला अरोमॅटीक मंद, चंदनी सुवास.. श्रेष्ठांचा चेहरा एरवीही बुद्धासारखा शांत असतो, त्यावेळी तर ते सखोल ध्यानमग्न मुद्रेत गेल्यासारखेच वाटले. प्रत्यक्ष पेंटींग करत असताना त्यांना बघण्याची संधी काही मिळाली नाही, तशी ते कुणालाच देत नाहीत, स्टुडिओत प्रवेश मिळाला हाच दुर्मिळ योग. त्यामुळे ध्यानाला बसण्याची तयारी करावी अशा श्रद्धने, एका लयीत केलेली पेंटींगची पूर्वतयारी पहाता आली.  
लक्ष्मण श्रेष्ठा हे गायतोंडेंचे शिष्य, त्यांच्यावर जपानी तत्वद्न्यानाचा, निसर्गदत्त महाराजांच्या झेन शिकवणीचा प्रभाव साहजिकच. पेंटींगही ते अशाच संथ, ठाम लयीत करत असणार.
याच्या उलट जॅक्सन पोलॉक झपाट्याने, व्हिगरसली पेंटींग करायचा, आडव्या कॅन्व्हासवर पेंट अक्षरश: ओतून तो पॅशनेटली पेंटींग पूर्ण करायचा. व्हिडिओमधला, हालचालींमधे कमालीचा वेग असलेला पोलॉक पेंटींग करताना दिसतो मात्र अक्षरश: समाधीत गेल्यासारखाच. आजूबाजूच्या जगाशी त्या क्षणांमधे त्याचं जणू काही नातंच नाहीये. ही एकाग्रता ध्यानमग्नतेपेक्षा वेगळी नाही.
वेगवान लयीतूनही झेन साध्य होतोच.   
गौर बसण्याच्या दिवशी माझ्या आईच्या हालचालींकडे पहात बसावेसे वाटे. अत्यंत मन लावून, सावकाशपणे ती एकेका गोष्टींची जमवाजमव करायची. गौरींचे रंगवलेले, गळ्यात काळ्या मंगळसुत्राची दुहेरी पोत घातलेले पितळी मुखवटे खणाच्या कापडांनी झाकून ठेवलेले, त्यांच्या शेजारी ताटात ओटीची तयारी करणे, गौरीला नेसवायच्या रेशमी साड्या हलकेच झटकून त्यांच्या नि-या सारख्या करुन ठेवणे, तबकात फ़ळे, फ़ुले, हळदकुंकवाची तयारी.. आई शांतपणे एकेक कामं करायची. एरवी तिच्या कामात झपाटा असे, पण त्यावेळी कसलीही घाई, गडबड नाही. सणाचा, नैवेद्याचा स्वयंपाक करतानाही ती अत्यंत हलक्या हातांनी वावरे. मराठीत त्याला’निगुतीने’ असा सुरेख शब्द आहे. एकही गोष्ट त्यादिवशी लवंडणार नाही, खाली सांडणार नाही, काही पडणार नाही; तशी काळजी घ्यावीच लागणार नाही अशा अदब हालचाली.  सकाळची लवकर, पहाटेचीच म्हणावी अशी वेळ असूनही आईच्या ओट्यापाशी वावरण्याची कसलीही चाहूल लागायची नाही. शिजलेल्या अन्नपदार्थांचा सात्विक सुवास तेवढा आसपास दरवळत राही.  
आमच्याकडे सुतारकामाला येणारे मिस्त्री, कामाला सुरुवात करण्याआधी, पिशवीतून हत्यारे बाहेर काढून त्यांना नमस्कार करणार. मग एकेक अवजार वर्तमानपत्राच्या दुहेरी कागदांवर सावकाश ठेवणार. डॉक्टर सर्जरी करताना जसे सावकाश, हलक्या हाताने एकेक शस्त्र हाताळतात, तसेच.
संपूर्ण एकाग्रता, मनाची शांतता असली की हालचालींमधे एक सावकाश डौल आपोआपच येतो
अंगणात पालथी मांडी घालून रांगोळीचा एकेक ठिपका उमटवणारे हात, काळजीपूर्वक रंग भरणारी बोटे, हातगाडीवर एकावर एक अलगदपणे संत्री रचणारा फ़ळवाला, दुकानात काचेच्या बरणीत देखणेपणाने ड्रायफ़्रूट्स रचणारा मुलगा.. हालचालींमधे लय साधली गेली की त्या कामात आपोआप सौंदर्य भरले जात असणार.
सकाळी लवकर उठून लिहायला बसायची सवय लागली आणि मग त्या शांत वेळी लिहिण्याची तयारी करताना मलाही आपोआप हे झेन सापडत गेले. ते पूर्ण सापडले नाही कदाचित, पण निदान जाणीव झाली. लिहायला बसायच्या जागेवर बैठे टेबल सेट करणे, पाठीमागे मोठा तक्क्या, हाताला टेकण म्हणून बाजूच्या भिंतीला लोड, त्यावर मऊ उशी, जवळ पाण्याची बाटली, अधूनमधून तोंडात टाकायला आवडतात म्हणून भाजलेल्या फ़्लॅक्स- सनफ़्लॉवर बियांची बाटली, हाताशी सारेगामा कारवां, प्लगपॉइन्टला चार्जर जोडणे, लॅन्डलाईन वाजली तर उठायला नको म्हणून कॉर्डलेस जवळ आणून ठेवणे.. अशी सगळी तयारी एकेक करुन करताना मनाची एकाग्रता आपोआप बिल्ट अप व्हायला लागते.
आपल्या कामाकडे रिच्युअल म्हणून, एक धार्मिक कर्म म्हणून पहाणा-यांना झेन वेगळा शिकायची गरजच नसते.    
झेनमधलं अजून एक तत्व मला फ़ार आवडतं.
रोजच्या दिवसातल्या वेळेची “माय टाईम”, आणि “वर्क टाईम” अशी विभागणी करु नका.
हे फ़ारच छान वाटलं. टू डू लिस्ट करताना लिहिण्याची कामे, घराची कामे, वैयक्तिक कामे अशा कॅटेगरी करुन लिहिणं त्रासदायकच आहे. तसंही दिवसभरात कामे पार पाडताना सगळं एकातएक होतंच. म्हणजे स्वयंपाक करताना कामाचे फोन करुन टाकणं वगैरे. त्यामुळे हे सुटसुटीत आणि प्रॅक्टीकल वाटले. पण अर्थातच झेनमधे हे इतकंही सोपं नाही. त्यांच्या मते स्वयंपाक करताना फ़क्त स्वयंपाकच करा. मन लावून, आनंद घेत. त्यावेळी फोन वगैरे नाही करायचा. मल्टीटास्कींग इस स्ट्रिक्टली नो नो.
तेव्हा झेन वे ऑफ़ वर्किंग आकर्षक आहे पण सोपे नाहीच.