Monday, April 25, 2016

पॅटर्नच्या अलीकडे पलीकडे..

पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे तुम्हाला हलता येत नाही. म्हणजे तुमचं जगणं, वाचणं, बोलणं, व्यक्त होणं, लिहिणं अगदी वेगळं वागणंही पॅटर्नच्या आसपासच. पॅटर्न रक्तात गोंदवलेला असतो. डिएनएच्या पत्र्यावर ठोकलेला असतो.
आपल्या जन्माच्याही अगोदरपासून कित्येक जन्मलेल्यांनी त्यांच्या जगण्यातून ठरवलेला पॅटर्न.
पॅटर्नच्या जरा इकडे किंवा जरा तिकडे बरेच जण जातात. काही मोजके फ़ारच इकडे किंवा फ़ारच तिकडे सरकत जातात. दुस-या पॅटर्नच्या जगण्याकडे आकर्षित होऊन, त्यांच्या जवळ, कधी कधी थेट त्यांच्या परिघातच घुसून.
त्यातले काही नंतर व्यक्त होतात लिहिण्यातून, बोलण्यातून तेव्हा आपल्यापर्यंत त्यांचं असं खूप इकडे तिकडे सरकून वागलेलं, जगलेलं पोचतं.
अर्थात व्यक्त होताना, व्यक्त होण्याकरता त्यांना पुन्हा आपल्या आधीच्या पॅटर्नच्याच आसपास येऊन पोचावं लागतच, तरंच आपलं पॅटर्नपासून फ़टकलेलं जगणं पॅटर्नच्या परिघात जगणा-यांपर्यंत पोचवण्यात यश मिळतं. त्यांना याची का गरज वाटावी? म्हणजे त्यांना खास याकरता पुन्हा पॅटर्नच्या इतक्या जवळ यावसं वाटावं हे जरासं केविलवाणच. आधीचा सगळा प्रयास कशाकरता होता मग?
पण निदान त्यामुळे आपल्याला वेगळं जगलेलं, वागलेलं पहायला मिळतं.
काही मुळातच आपल्यापेक्षा वेगळ्या पॅटर्नमधे जगणारी असतात. ते त्यांच्या पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे न हलता जगतात. त्यांच्यापैकी काहीजण खूपच अलीकडे पलीकडे जाऊन आपल्या पॅटर्नच्या अगदी जवळ, अगदी आपल्या परिघातच येऊन जगायला लागतात. आपल्याला सुरुवातीला ते वेगळं वाटतं पण त्यांच्या परिघातून आपल्या परिघापर्यंत येईस्तोवर त्यांच्या वेगळ्या पॅटर्नचे कानेकंगोरे घासुन, ठोकून आपल्या पॅटर्नमधे फ़िट बसण्याजोगेच झालेले असतात. अगदी त्यांच्या अंगावरचे वेगळे ठिपके, डिझाईनही फ़िकट होऊन पुसलेले आणि इव्होल्यूशनच्या थियरीनुसार या बदललेल्या पॅटर्नच्या नव्या डिझाईनचा अंगरखा त्यांच्या अंगावर चढायला सुरुवातही.

पॅटर्नमधल्यांची अशी ये-जा सारखी चालूच असते. एका पॅटर्नवाल्यांना दुस-या पॅटर्नवाल्यांच्याअ ख-या जगण्या वागण्याची फ़ारशी जेन्युईन कल्पना येऊच नये या हेतूने सगळी रचना कशी पॅटर्नप्रूफ़.  

3 comments:

  1. डोळ्या समोर बऱ्याच व्यक्ती तरळल्या😀,तुझ्याही डोळ्यासमोर काही पात्र असणार हे नक्की

    ReplyDelete
    Replies
    1. हो, आहेत. हे लिहिलं तेव्हा एक सेलेब्रिटी चित्रकार भेटला होता. त्याचा पॅटर्नमधे अडकायचं नाही पासूनचा पॅटर्नलाच आर्ट बनवण्यापर्यंतचा प्रवास आठवला.

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete