Sunday, April 24, 2016

मुंबई मोमेन्ट-एक

भर दुपारचं मुंबईतलं रणरणतं उन्ह. आजचा शनिवार बरेच दिवस राहून गेलेली टाऊनमधली काही महत्वाची आर्ट एक्झिबिशन्स बघण्याचा. चालतच जायचं हा अट्टहास भारी पडतोय का असं या कोसळत्या उन्हामधे पावलं उचलताना क्षणोक्षणी वाटतय. पण मजाही येतेय. 

एनजिएमएमधे सौंदर्यवादी, फ़िगरेटीव परंपरेतले आलमेलकर बघून झाल्यावर वरच्या डोममधे भरलेलं प्रभाकर पाचपुतेचं विदर्भातल्या कोळशांच्या खाणींमुळे बदललेल्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य असलेलं इन्स्टॉलेशन बघणं हा किती टोकाचा, वेगळा अनुभव. एक नॉस्टेल्जियाची सुनहरी सैर आणि दुसरी जळजळीत वर्तमान. आलमेलकरांची स्ट्रॉबोर्डवरची लयबद्ध आदिवासी जीवन चित्रित करणारी आल्हाददायक स्केचेस, कॅनव्हासवरची वॉटरकलर्स, टेम्पेरा..  त्यात त्यांच्या जगण्यातलं वास्तव फ़ारसं आलेलं नाही, आलं असलंच तर आकर्षक, निर्भर, काव्यमय जगण्याच्या टिपिकल साच्यातलंच. पाचपुतेने डोमच्या भिंतींवर कोळशाने चितारलेली स्वैर स्केचेस, मातीच्या जमिनीवरचे तडे, खाणींमुळे पडलेली विवरं, टोळधाडी, खाणकामगारांचं अधांतरी, असुरक्षित जगणं.. चित्रकला निदान इतका प्रवास करुन वास्तवापर्यंत पोचते आहे हे दिलासादायक वाटलं.
क्लार्क हाऊसमधलं सचिन बोंडेचं प्रदर्शन, तेलसाम्राज्याचा राजकीय, सांस्कृतिक आढावा हेही याच प्रकारातलं. 
केमोल्डमधे डेसमन्ड लाझारेस. मायग्रेशनची त्याची वैयक्तिक कहाणी..

आर्टीस्ट्सचं काम पाहून झाल्यावर नेहमी मनात येणारा सनातन प्रश्न. पोचलाय का हा माणूस पूर्णपणे आपल्यापर्यंत त्याच्या कलेसोबत? कशाला पोचायला हव खरं तर? कथेतून, कादंबरीतून लेखकातला माणूस कुठे पोचतो प्रत्येकवेळी? मग चित्रकाराच्या मनातल्या उर्मी, स्पंदनं कॅनव्हासवरुन पोचायला हवीत हा मनाचा आग्रह का आहे माझ्या? आर्ट एक्झिबिशन पाहून झाल्यावर आर्टिस्टशी बोलल्याशिवाय, त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. त्याचा प्रवास आणि माझ प्रवास हा एका कोणत्या तरी बिंदूला एकमेकांना छेदायला हवा. त्या क्षणीक नजरानजरीतून जे समजतं ते अलौकिक असतं हे मात्र खरं.

वेवर्ड अ‍ॅन्ड वाईजमधून जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जेफ़ डायरचं द सर्च घेतलय. त्याचं जेफ़ इन व्हेनिस आवडलेलं. बघू हे कसं आहे. या दुकानात आख्खा दिवस घालवायचा आहे एकदा. किंवा अनेकदा.


3 comments:

  1. हे वाचुन एक प्रश्न पडलाय, हल्ली मराठीत जसं गोडबोल्यांची किंवा प्रभु बाईंची माहितीपर पुस्तक जास्त खपतात तसं चित्रांमध्ये सामाजिक विषयांची लाट आहे का? अगदीच मर्यादित माहितीवर प्रश्न विचारतोय, त्यामुळे ढ म्हटलस तरी चालेल

    ReplyDelete
  2. सामाजिक विषयांची लाट असं काही असेल तर ती आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात, भारतातही फ़ार उशिरा आणि अत्यंत संथपणे आलीय संवेद. बघ ना आपल्याकडची इतक्या थोर परंपरेची कोल्हापूरची व्यक्तिचित्रांची परंपरा, किम्वा नाशिकपासून हिमालयापर्यंत सुंदर सुंदर निसर्गचित्र, सूर्योदय, सूर्यास्त, समुद्र, पर्वत शिखरं, फ़ुलं रंगवणा-या प्रादेषिक निसर्गचित्रकारांची परंपरा. खरा भारतीय प्रदेश कधी दिसलाच नाही त्यांच्या चित्रांमधून. एखादा कम्युनिस्ट चित्तोप्रसाद किंवा यूरोपातून शिकून आलेली शेरगिल, किंवा अलिकडचे सुधीर पटवर्धन सन्माननीय अपवाद. सामाजिक प्रश्न अगदी व्हिन्सेन्टच्या बटाटे खाऊन जगणा-या माणसांमधूनही तिकडे ज्या तीव्रतेने दिसू शकले तसे आपल्याकडचे का नाही कधीच दिसले या सो कॉल्ड रिजनल आर्टिस्ट्सच्या चित्रांमधून, शिल्पांमधून? आता दिसताहेत या तरुण चित्रकारांमधे तर स्वागत आहे ते त्याकरता.

    ReplyDelete
  3. ब्लॉगचं तहेदिलसे स्वागत. हे पोस्ट वाचताना मध्यंतरी पाहिलेलं गणोरकरांचं प्रदर्श्न आठवत राहिलं...
    आता इथे कारणाकारणानं चक्कर होईल.

    ReplyDelete