जॉगर्सपार्कच्या बाहेरच्या गुलमोहोराची लाल फ़ूले लगडलेली एक फ़ांदी सप्पाकन कापून रस्त्याच्या मधोमध टाकून दिलेली. अशक्य शहारा येतो अंगावर. पाऊस येईल आता लवकरच तेव्हा त्याच्या तयारीची ही मुन्सिपाल्टीची लगबग.
ब-यापैकी तरुण ्वयातला एक्स बॉस हार्ट अॅटेकने दोन दिवसांपूर्वी गेला ही बातमी मनात नेमकी तेव्हाच घोळत असते,
मुंबईत घामाच्या धारा लागलेल्या असताना कुठे कुठे, पुणे, नाशीक वगैरे ठिकाणी पावसाच्या सरीने वातावरण धुंदफ़ुंद झाल्याची फ़ेसबुक स्टेटसे चीड आणतात.
कोंदलेल्या हवेत धड कामही झालेलं नसतं दिवसभर.
उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस नकोसे वाटतात. आंब्यांची क्रेझ ओसरलेली, लाल-पिवळ्या-जांभळ्या-निळ्या-गुलाबी फ़ुलांचे बहर डोळ्यांना सुखावून थकलेले असतात. आणि उकाडा ऐन भरात.
सरता उन्हाळा..
Wednesday, May 11, 2016
Sunday, May 1, 2016
उन्हाळी दुपार
लखलखत्या उन्हामधे खिडकीबाहेर पहाताना तंद्री लागते. हिरव्या पोपटी लहानशा पानांच्या ढिगावर सोनेरी पिवळी बुंदक्यांसारखी सजलेली पेल्टोफ़ोरमची फ़ुले वा-याच्या झुळकीत इकडुन तिकडे डोलतात आणि मग टपटपत खाली उड्या मारतात. बिल्डिंगच्या आवारात पिवळ्या फ़ुलांच्या गालीच्याची गच्चदाट पखरण होते दिवसभर. पार्क केलेल्या गाड्यांच्या टपावरही पिवळे बुंदके चिकटवल्यासारखे. हे यलो पेल्टोफ़ोरम इन्स्टॉलेशन चैत्राचं. मांडीवरचा लॅपटॉप स्तब्ध होतो, काय लिहायचं ते कधीच मनातून गळून पडलय. जरा कान दिला तर पेल्टोफ़ोरमचं फ़ुल गाडीच्या टपावर पडतानाचा अलगद आवाजही ऐकू येईल याची खात्री वाटावी इतकी निरव स्तब्धता.
उन्हाळाच्या अशा दुपारच्या वेळा खतरनाक.
उन्हाळाच्या अशा दुपारच्या वेळा खतरनाक.
रविवारी संजय गांधी नॅशनल पार्कमधे प्रेस्ड फ़्लॉवर वर्कशॉपला गेले होते. बॉटनीची स्टुंडन्ट असल्याने मला हर्बेरियम्स कशी करायची माहित आहे. शिकत असताना बोटॅनिकल एक्सकर्शन्सना गेल्यावर वेगवेगळी फ़ुलं, पानं प्रेस करुन सुकवायचं टेक्निकही माहित झालेलं. नंतर बॉटनीशी संबंध सुटला पण कशी माहित नाही, फ़ुलं सुकवायची सवय कायम राहिली. मधून मधून बुकमार्क, ग्रिटींग करुन मित्र-मैत्रिणींना देण्याकरता त्यांचा उपयोग व्हायचा. पण हा उत्साह फ़ार कमी वेळा येतो. या वर्कशॉपमधे सुकवलेल्या फ़ुलांचं आणखी काही वेगळं, सोपं करायला शिकवतील असं वाटलेलं. तर ते तसं काही फ़ार वेगळं मिळालं नाही शिकायला पण त्या निमित्ताने इतक्या सकाळी (साडेसात वाजता) बोरिवलीच्या जंगलात जायचा अनुभव खूप वर्षांनंतर घेतला. काही वर्षांपूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नेचर ट्रेल्सना खूप वेळा यायचे. लोकं मस्त दुर्बिणी वगैरे घेऊन बर्ड वॉचिंग करत होते, सायकली फ़िरवत होते, व्यायाम चालू होते, काहीजण भल्या पहाटेच जंगलात खोलवर फ़िरुन आता परतत होते. मस्त, उत्साही वातावरण. सगळ्यात सुंदर गुलमोहोर, पळस, काटेसावर, सोनमोहोर, बहावा, आसूपालवचे फ़ुलांनी लगडलेले वृक्ष. अहाहा.. हावरटासारखी पुन्हा खाली गळून पडलेली फ़ुलं, शेंगा, बिया गोळा करुन घेतल्यात. आता वर्कशॉपमधे शिकवलेल्या जरा वेगळ्या टेक्निकने पुन्हा काहीतरी करुन बघायला हवा. अंगात नवा उत्साह भरण्याची निसर्गाची शक्ती अफ़ाट आहे.
Subscribe to:
Posts (Atom)