Monday, December 28, 2020

“थिंक ऑन पेपर”

जर्नलिंग-मॉर्निंग पेजेस-डायरी-ब्लॉगिंग काहीही म्हणा, पण पर्सनल रायटींग हे माझ्या दृष्टीने सेल्फ़-मॅनेजिंग, सेल्फ़-इम्प्रुविंग अशा अर्थाने कायम उपयोगी पडलेले आहे. मला ते रिलॅक्सिंग वाटते, डोक्यातला कोलाहल शांत होतो, आणि डॉर्मन्ट राहिलेल्या अनेक कल्पनांची बीजे तरतरुन वर येत रहातात लिहिताना. 

सुरुवातीला मी ऎक्टीविटी लॉग करायचे. म्हणजे किती वाजता उठले/लिहायला बसले/आज काय वाचलं/कोणाशी बोलले/फ़िल्म्स कोणत्या पाहिल्या/सोशल मिडियावर नेमका किती वेळ घालवला किंवा काय केलं? असं सगळं क्वान्टीफ़ाय. डेरियस फ़ोरोक्स ज्याच्याकडून मी तीन वर्षांपूर्वी सेल्फ़-मॅनेजमेन्ट कौंन्सेलिंग घेतलं होतं त्याने मला काही बेसिक वाटणारे प्रश्न दिले होते, ज्यांची उत्तरं मी रोज लिहिणं अपेक्षित होतं. सुरुवातीला मी इरिटेट व्हायचे, याचा काय उपयोग असं वाटून. पण जसजशी मी रोज लिहायला लागले तसा मला त्यामागचा एक्झॅक्ट मोटीव लक्षात आला. कारण त्यातल्या उत्तरांमधून माझा बराचसा आळशीपणा, चालढकलेगिरी, कंटाळा उघडा पडायला लागला. प्रश्न असे होते-

  • What time did you wake up today?
  • What was the first thing you did?
  • What did you have for breakfast?
  • How did you feel during the morning?
  • What did you work on today? How did it go?
  • What book are you reading? What do you think about it?

शिवाय यातून एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली, की आपल्या मेमरीला तसा काही अर्थ नसतो. ठळक प्रसंग सोडले तर फ़ार काही आपण दिवसभरातलं चोवीस तासांच्या वर लक्षात ठेवत नाही, ठेवू शकत नाही, कारण सोशल मिडिया आणि आजूबाजूच्या वातावरणातून भरमसाठ डोक्यावर आदळत रहातं. त्यामुळे या साध्या प्रश्नांच्या उत्तरांना काही ठराविक काळानंतर माझ्यापुरतं एक महत्वाचं संदर्भमूल्य मला मिळत होतं. जयपूर लिटफ़ेस्टमधे मेम्वायर्सचं एक सेशन मी अटेंड केलं होतं, त्यावेळी मधुर जाफ़रीचं मेम्वायर नुकतं पब्लिश झालं होतं. ती सांगत होती- अनेक फ़ॅमिली एव्हेन्ट्स, ज्यात मी आणि माझी भावंड सामिल असायचो, उदा. काही समारंभ, पिकनिक्स वगैरे, त्याबद्दलच्या आठवणी लिहिताना मी संदर्भ अचूक असावेत म्हणून माझ्या भावाला किंवा मित्र-मैत्रिणींना विचारायचे, त्यांना काय आठवतय याबद्दल म्हणून. एक प्रसंग होता, जेव्हा एका आमराईत आम्ही आमच्या घरच्या गाडीतून सगळे गेलो होतो, सहा-सात भावंड. त्यावेळी माझा मोठा भाऊ आणि मी खूप भांडलो होतो, त्याने मला गाडीतून ढकलून दिलं होतं आणि माझा हात मोडला होता. भावाला मी विचारलं तेव्हा त्याला मुळात मी गाडीत होते सगळ्यांसोबत हेच आठवत नव्हतं. नंतर भांडण दुस-याच एका भावाबरोबर झालं होतं असं तो म्हणाला. प्रत्येक भावाला गाडी कोणत्या मेकची होती, तिचा त्यावेळी रंग काय होता, ड्राइव्ह कोण करत होतं याबद्दल वेगळ्या स्मृती होत्या. थोडक्यात काय, आपल्या आठवणी आपल्याला हवं ते, हवं तसंच मेंदूत साठवतात, कालांतराने त्यावर वेगवेगळे रंग, थर चढत जातात. आपल्या काही कटू आठवणींकडे आपण वेगळ्या पर्स्पेक्टीवने बघू शकत होतो, त्याची गरज आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. त्यामुळे जे महत्वाचं आयुष्यात घडलं ते निदान वस्तुनिष्ठतेनं नोंदवलं जायला हवं. जनरली हा ऎक्टीविटी लॉग मी रात्री लिहिते.

त्यानंतर मग- मॉर्निंग पेजेस, आयडिया जर्नलिंग जे सकाळी, दिवसभरात केव्हाही करते. एडिट न करणे ही मॉर्निंग जर्नलची मुख्य अट. स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेस जर्नलिंग.

मला अनेकदा स्ट्रेस येत रहातो, ऎन्क्झायटी सिन्ड्रोम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी जर्नलिंग कमालीचे उपयोगी पडते. लिहित जाताना अनेकदा स्ट्रेसचे कारण किती फ़ालतू आहे, त्यावर अमुक एक करता येऊ शकतं, हे सुचत जातं. किंवा स्ट्रेस येण्यामागची काही लपलेली कारणं लक्षात येत जातात. म्हणजे एखाद्या लेखाचा अचानक स्ट्रेस येतो, तेव्हा नुसती डेडलाईन त्यामागचं कारण नाही, मुळात विषयच माझ्या आवडीचा नाही, किंवा त्याचा पुरेसा रिसर्च झालेला नाही हे लक्षात येतं. ऑनलाईन वर्कशॉपचा स्ट्रेस आला, तेव्हा माध्यम नवं आहे इतकंच त्यामागे नव्हतं, इंग्लिश किंवा मराठीतही फ़्लुएन्ट, प्रवाही संवाद साधणं जमेल का याची चिंता होती.

“थिंक ऑन पेपर” हा प्रकार एकंदरीतच मला जास्त सोपा आणि उपयोगी वाटतो.

एक महत्वाचं म्हणजे जर्नलिंग ही फ़क्त टू डू लिस्टचा सविस्तर प्रकार नाही हे लक्षात ठेवणे- ही एक रिफ्लेक्टींग ऎक्टीविटी आहे. त्यामुळे ते मी काय करायला हवं होतं, काय केलं यानी फ़ार क्लटर करण्यात अर्थ नाही.

माझ्या हॅबिट ट्रॅकरमधे जर्नलिंग इन्क्लुड केलं त्याचा नक्की फ़ायदा झाला. त्यामुळे अकाउंटेबिलिटी वाढली. या ग्रूपवर लिहित रहाणे हेही माझ्या दृष्टीने मी ठरवलेल्या गोष्टींची अकाउंटेबिलिटी तपासण्याकरता उपयोगी ठरले.  

अर्नेस्ट हेमिंग्वेची एक बेस्ट रायटींग टीप आहे, पर्सनल जर्नलिंगच्या बाबतीत मी ती लक्षात ठेवते“Write one true sentence.” 


 

  

 


Friday, May 3, 2019

झेन सापडतो तेव्हा..



एकदा लक्ष्मण श्रेष्ठांना त्यांच्या स्टुडिओत ते करणार असलेल्या पेंटींगची तयारी करताना पाहिलं होतं. पेंटींग टेबलवरुन आधी अतिशय हलक्या हातांनी त्यांनी एक कोणत्या तरी पक्ष्यांच्या पिसाचा कुंचा फ़िरवला, मग मऊ फ़डक्यानी टेबलाचा पृष्ठभाग पुसून काढला. त्यावर रंगांच्या ट्यूब्ज एकाशेजारी एक मांडून ठेवल्या. ब्रश ठेवलेला व्हास रिकामा करुन त्यातले हवे असलेले ब्रश, नाईफ़ बाजूला काढली, मग बाकीचे पुन्हा एकेक करुन भरुन ठेवले. संथ लयीतल्या हालचाली. स्टुडिओच्या दरवाजाजवळ लहानसा तेलाचा दिवा, वातावरणातला अरोमॅटीक मंद, चंदनी सुवास.. श्रेष्ठांचा चेहरा एरवीही बुद्धासारखा शांत असतो, त्यावेळी तर ते सखोल ध्यानमग्न मुद्रेत गेल्यासारखेच वाटले. प्रत्यक्ष पेंटींग करत असताना त्यांना बघण्याची संधी काही मिळाली नाही, तशी ते कुणालाच देत नाहीत, स्टुडिओत प्रवेश मिळाला हाच दुर्मिळ योग. त्यामुळे ध्यानाला बसण्याची तयारी करावी अशा श्रद्धने, एका लयीत केलेली पेंटींगची पूर्वतयारी पहाता आली.  
लक्ष्मण श्रेष्ठा हे गायतोंडेंचे शिष्य, त्यांच्यावर जपानी तत्वद्न्यानाचा, निसर्गदत्त महाराजांच्या झेन शिकवणीचा प्रभाव साहजिकच. पेंटींगही ते अशाच संथ, ठाम लयीत करत असणार.
याच्या उलट जॅक्सन पोलॉक झपाट्याने, व्हिगरसली पेंटींग करायचा, आडव्या कॅन्व्हासवर पेंट अक्षरश: ओतून तो पॅशनेटली पेंटींग पूर्ण करायचा. व्हिडिओमधला, हालचालींमधे कमालीचा वेग असलेला पोलॉक पेंटींग करताना दिसतो मात्र अक्षरश: समाधीत गेल्यासारखाच. आजूबाजूच्या जगाशी त्या क्षणांमधे त्याचं जणू काही नातंच नाहीये. ही एकाग्रता ध्यानमग्नतेपेक्षा वेगळी नाही.
वेगवान लयीतूनही झेन साध्य होतोच.   
गौर बसण्याच्या दिवशी माझ्या आईच्या हालचालींकडे पहात बसावेसे वाटे. अत्यंत मन लावून, सावकाशपणे ती एकेका गोष्टींची जमवाजमव करायची. गौरींचे रंगवलेले, गळ्यात काळ्या मंगळसुत्राची दुहेरी पोत घातलेले पितळी मुखवटे खणाच्या कापडांनी झाकून ठेवलेले, त्यांच्या शेजारी ताटात ओटीची तयारी करणे, गौरीला नेसवायच्या रेशमी साड्या हलकेच झटकून त्यांच्या नि-या सारख्या करुन ठेवणे, तबकात फ़ळे, फ़ुले, हळदकुंकवाची तयारी.. आई शांतपणे एकेक कामं करायची. एरवी तिच्या कामात झपाटा असे, पण त्यावेळी कसलीही घाई, गडबड नाही. सणाचा, नैवेद्याचा स्वयंपाक करतानाही ती अत्यंत हलक्या हातांनी वावरे. मराठीत त्याला’निगुतीने’ असा सुरेख शब्द आहे. एकही गोष्ट त्यादिवशी लवंडणार नाही, खाली सांडणार नाही, काही पडणार नाही; तशी काळजी घ्यावीच लागणार नाही अशा अदब हालचाली.  सकाळची लवकर, पहाटेचीच म्हणावी अशी वेळ असूनही आईच्या ओट्यापाशी वावरण्याची कसलीही चाहूल लागायची नाही. शिजलेल्या अन्नपदार्थांचा सात्विक सुवास तेवढा आसपास दरवळत राही.  
आमच्याकडे सुतारकामाला येणारे मिस्त्री, कामाला सुरुवात करण्याआधी, पिशवीतून हत्यारे बाहेर काढून त्यांना नमस्कार करणार. मग एकेक अवजार वर्तमानपत्राच्या दुहेरी कागदांवर सावकाश ठेवणार. डॉक्टर सर्जरी करताना जसे सावकाश, हलक्या हाताने एकेक शस्त्र हाताळतात, तसेच.
संपूर्ण एकाग्रता, मनाची शांतता असली की हालचालींमधे एक सावकाश डौल आपोआपच येतो
अंगणात पालथी मांडी घालून रांगोळीचा एकेक ठिपका उमटवणारे हात, काळजीपूर्वक रंग भरणारी बोटे, हातगाडीवर एकावर एक अलगदपणे संत्री रचणारा फ़ळवाला, दुकानात काचेच्या बरणीत देखणेपणाने ड्रायफ़्रूट्स रचणारा मुलगा.. हालचालींमधे लय साधली गेली की त्या कामात आपोआप सौंदर्य भरले जात असणार.
सकाळी लवकर उठून लिहायला बसायची सवय लागली आणि मग त्या शांत वेळी लिहिण्याची तयारी करताना मलाही आपोआप हे झेन सापडत गेले. ते पूर्ण सापडले नाही कदाचित, पण निदान जाणीव झाली. लिहायला बसायच्या जागेवर बैठे टेबल सेट करणे, पाठीमागे मोठा तक्क्या, हाताला टेकण म्हणून बाजूच्या भिंतीला लोड, त्यावर मऊ उशी, जवळ पाण्याची बाटली, अधूनमधून तोंडात टाकायला आवडतात म्हणून भाजलेल्या फ़्लॅक्स- सनफ़्लॉवर बियांची बाटली, हाताशी सारेगामा कारवां, प्लगपॉइन्टला चार्जर जोडणे, लॅन्डलाईन वाजली तर उठायला नको म्हणून कॉर्डलेस जवळ आणून ठेवणे.. अशी सगळी तयारी एकेक करुन करताना मनाची एकाग्रता आपोआप बिल्ट अप व्हायला लागते.
आपल्या कामाकडे रिच्युअल म्हणून, एक धार्मिक कर्म म्हणून पहाणा-यांना झेन वेगळा शिकायची गरजच नसते.    
झेनमधलं अजून एक तत्व मला फ़ार आवडतं.
रोजच्या दिवसातल्या वेळेची “माय टाईम”, आणि “वर्क टाईम” अशी विभागणी करु नका.
हे फ़ारच छान वाटलं. टू डू लिस्ट करताना लिहिण्याची कामे, घराची कामे, वैयक्तिक कामे अशा कॅटेगरी करुन लिहिणं त्रासदायकच आहे. तसंही दिवसभरात कामे पार पाडताना सगळं एकातएक होतंच. म्हणजे स्वयंपाक करताना कामाचे फोन करुन टाकणं वगैरे. त्यामुळे हे सुटसुटीत आणि प्रॅक्टीकल वाटले. पण अर्थातच झेनमधे हे इतकंही सोपं नाही. त्यांच्या मते स्वयंपाक करताना फ़क्त स्वयंपाकच करा. मन लावून, आनंद घेत. त्यावेळी फोन वगैरे नाही करायचा. मल्टीटास्कींग इस स्ट्रिक्टली नो नो.
तेव्हा झेन वे ऑफ़ वर्किंग आकर्षक आहे पण सोपे नाहीच.

Saturday, January 14, 2017

मेहफ़िल-ए-असीम

काही सुंदर मौके आपणहून तुमचं दार ठोठावतात.
मीरा दातार यांचा फोन आला उर्मिला सिरुर यांचा एक नवा कथासंग्रह पुस्तक मौजने काढला आहे, त्यानिमित्त त्यांच्या मुलीच्या शिवाजी पार्कच्या घरी एक अनौपचारिक कार्यक्रम करतो आहोत, येशील का?
"अर्थातच"- माझं उत्तर त्वरित होतं.

मीरा दातार म्हणजे चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे यांची कन्या. दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टीट्यूटमधे प्रिन्सिपल आहेत, स्वत: अर्थातच चित्रकारही.

उर्मिला सिरुर यांचा या आधीचा, पहिला, कथासंग्रह ’कवडसे’. हा मी सहज निदान वीस वर्षांपूर्वी वाचला होता. फ़ार आवडला होता. स्वत:ची पुस्तके विकत घ्यायला सुरुवात केली होती नुकतीच. गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे या नावांच्या यादीत या लेखीकेची भर पडली. मला जसं वाचायला आवडतं तसंच त्यांनी लिहिलेलं. सुंदर समकालिनता आणि साधी सरळ, कसलंही अवडंबर नसलेली भाषा, कथेचं बीज फ़ुलवत नेण्यातली सहजता.
त्यात एक कथा होती,  एका चित्रकार मुलीचा समोर बसवलेल्या न्यूड मॉडेलवरुन पेंटींग करतानाचा अनुभव वर्णन करणारी. त्या पेंटींग क्लासमधल्या अ‍ॅम्बियन्स, मानसिकता, रंगांचं पॅलेट.. असं सगळं इतकं वास्तव, तरल भाष्य होतं त्यात. मनात ठसली ती कथा. अजून इतरही कथा लक्षात राहिल्या, पण ही जास्त.

तीनेक वर्षांपूर्वी’चिन्ह’च्या ’नग्नता-चित्रातली, मनातली’ विशेषांकाच्या वेळी ’चिन्ह’च्या ब्लॉगवर या कथेच्या आठवणीचा उल्लेख होता. त्यावेळी उर्मिला सिरुर यांचा सतीश नाईकना फोन आला होता, ही कथा अजून कोणाला आठवते याचं त्यांना त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं आणि अर्थातच आनंदही झाला होता.

माझ्याकडचा तो कथासंग्रह नंतर कधीतरी हरवला होता. कोणीतरी वाचायला नेला आणि परत आला नाही.
मधल्या काळात अधून मधून उर्मिला सिरुर नाव दिसायचं. एखाद्या दिवाळी अंकामधे एखादी कथा वाचली जायची, पण एकत्रित वाचलेल्या कथा जास्त परिणामकारकतेनं आणि सलगतेनं लक्षात रहातात,  दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत वाचलेलं नंतर फ़ार आठवत नाही, तसंच या कथांबद्दल झालं.

आता मीराचा फोन आला तेव्हा उर्मिला सिरुर यांना भेटण्याची उत्सुकता वाटली ती त्यांच्या आधीच्या कथांच्या आठवणींमुळे.

उर्मिला सिरुर आता ऐंशीच्या घरात सहज असाव्यात. पण मस्त टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वृत्ती. छानसा चुडीदार घातलेल्या सिरुर लहानशा, तरुण मुलीसारख्याच वाटल्या.
"अगं माझं हे नाव म्हणजे ’बुरखा’ आहे, माहितेय का तुला?" गप्पांची सुरुवातच अशी मजेनी झाली.
इतकं ख-यासारखं वाटणारं टोपण नाव, मला अर्थातच शंकाही का यावी?
माझ्या चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्या मिश्किल हसत म्हणाल्या, "माझ्या ओळखीची एक उर्मिला होती, उंच, सडसडीत बांध्याची, लांब केसांची. माझी उंची लहानशी, मग वाटलं लिहिताना तिचंच नाव घ्यावं. छान वाटलं वेगळ्या नावानी लिहिताना. मोकळेपणानी लिहिता आलं, आणि शिवाय नव-याच्या ओळखीतल्या लोकांना मी माझ्या कथेत घ्यायचे तेव्हा त्यालाही कानकोंडं व्हायला नको असा विचार होता. मग सवयच लागली या बुरख्याची"
मलाही हसायला आलं हे ऐकताना. पण मग ’सिरुर’ हे आडनाव कुठलं?
तर म्हणाल्या.. असंच छान लय वाटली या आडनावाला. शिवाय एक सिरुर नावाचे चित्रकार होते, किर्लोस्कर, स्त्रीमधे त्यांची चित्रं यायची, ती आवडायची. म्हणून घेतलं."
आणि मग एअर इंडियात पायलट असलेल्या आपल्या नव-याला एकदा फ़्लाइटमधे दिलीप चित्रेंनी कशी मिस्टर सिरुर अशी हाक मारली याची आठवण काढून उर्मिला खूप हसतात.

उर्मिला सिरुर यांच्या या नव्या ’असीम’ नावाच्या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर पद्मा सहस्त्रबुद्धेंचं सुंदर पेंटींग आहे. निळ्या, हिरव्या लाटांचा असीम समुद्र.. खूप देखणं दिसतय कव्हरवर.
"पद्मा आणि मी मॉडेल आर्टला एकत्र चित्रकला शिकलो,  तिच्याइतकी सुंदर चित्रं काढणं काही मला जमणार नव्हतं, म्हणून मी मग त्या भानगडीत न पडता असं काहीबाही लिहायला लागले." उर्मिला सिरुर सांगतात, "पहिल्या कथासंग्रहावरचं चित्रं मात्र मीच काढलं होतं." दोघींची छान मैत्री अजूनही आहे.


बाजूच्याच टेबलावर दोन सुंदर शिल्प असतात, आणि एक बस्ट.
"ही आईने बनवली आहेत" किरण सांगते. "आई स्कल्प्टर आहे, पण घरात या सगळ्याचा मोठा पसारा घालणं नकोसं वाटलं तिला, शिवाय आमच्या घरी माणसंही खूप, ये जा सारखी चाले. इथे जवळच रहाते आई. तीन खोल्यांच्या फ़्लॅटमधे स्कल्पचर्सचा सेट अप करणं अवघडच."
किरण मोडक स्वत:ही छान सिरॅमिक आर्टिस्ट आहेत.

आम्ही गप्पा मारत असताना मग इतर निमंत्रितही येतात. मौजेचे संजय भागवत, मोनिका गजेन्द्रगडकर आणि त्यांची आई, रामदास आणि लैलाताई भटकळ, माणिक वालावलकर, नीलम देसाई.. शिवाय उर्मिला सिरुर यांचे जवळचे आप्तस्वकीय, जावई, मित्र-मैत्रीणी.. मग ब-याच गप्पा होतात. ललिता पटवर्धन येऊ शकल्या नसतात त्याबद्दल उर्मिला सिरुरना वाईट वाटतं. राम पटवर्धनांच्या घरी कथांवर कशी छान डिस्कशन्स व्हायची त्याच्या आठवणी निघतात. इतर पुस्तकं, लेखक, चित्रप्रदर्शनं.. छान गप्पा, खाणंपिणं,.  प्रसन्न आणि निवांत संध्याकाळ.

मनस्वीपणे, स्वत:ला हवं ते, हवं तेव्हाच, मोजकं पण दर्जेदार लिहिणारी, कलासक्त वृत्तीची एक आता वयाने परिपक्व झालेली लेखिका, तिच्या लिहिण्याबद्दल, तिच्या बद्दल आस्था बाळगणारे साहित्यिक, कलाप्रेमी वृत्तीची मोजकी पण जवळची माणसं सोबत.. छान रसायन जमून आलं होतं.

उर्मिला सिरुर माझ्या आठवणीत राहिलेल्या ’न्यूड’ कथेबद्दल बोलताना म्हणाल्या, "अगं, मला वाटलेलं, इतका वेगळा, काहीसा धाडसी विषय मांडलाय मी कथेतून.. खूप नाही, पण ब-यापैकी चर्चा होईल, पण फ़ार कोणी बोललच नाही कथेवर, माझ्यापर्यंत तिच्यावरचा प्रतिसाद आलाच नाही."

ती कथा पोचली होती त्यापेक्षाही जास्त हे बोलणं पोचलं एकदम आत्ता माझ्यापर्यंत. पोचलं काय, टोचलंच. लेखकाला आपण जे लिहिलं त्याबद्दल कोणी बोललेलं, त्यावर चर्चा झालेली, बरं-वाईट उच्च्चारलेलं, कौतुक केलेलं, कसं-कधी सुचलं असं काहीबाही विचारलेलं किती मनापासून हवं असतं हे मलाही माहित होतं आता.
आणि वाचक किती आळशी असतो. फ़ार क्वचित तो लेखकापर्यंत पोचतो हेही. मीही त्यापैकीच एक.
मी का नाही तेव्हा, जेव्हा ती कथा इतकी मनापासून आवडली होती तेव्हा जरा धडपड करुन लेखीकेपर्यंत पोचले तिला त्याबद्दल सांगायला?
आता सांगता आलं याबद्दल माझेच आभार मानून टाकते मग मी जिना उतरताना.









Saturday, December 3, 2016

म्युझियम डेज..

एक संदर्भ शोधण्याकरता मी नोटबुक्स, डाय-यांची उलथापालथ करत होते त्यावेळी मला २०१२ मधलं आर्ट जर्नल मिळालं. २०१२ च्या जुलैमधे मी डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियममधे त्याच वर्षी सुरु झालेल्या "मॉडर्न ऎन्ड कंटेम्पररी इंडियन आर्ट हिस्टरी" या पोस्ट ग्रॅड कोर्सकरता प्रवेश घेतला होता. कोर्स शुक्रवार-शनिवार-रविवार असे तीन दिवस असायचा.  शुक्रवार-शनिवार लेक्चर्स, त्यात शुक्रवारी इन-हाऊस फ़ॅकल्टी आणि शनिवारी एक्स्टर्नल फ़ॅकल्टी, आणि रविवारी आर्ट गॅलरी व्हिजिट्स, शोज- एक्झिबिशन्स वगैरे. 
हा कोर्स करत असताना मी एका आर्ट मॅगझिनचं काम करत होते, शिवाय एका दैनिकाकरता आर्ट कॉलम लिहायचे. बाकी इतर लेखन, फ़्रीलान्स असाइन्मेन्ट्स वगैरे असायच्याच. त्यामुळे सुरुवातीला प्रवेश घेतल्यावर सहज होऊन जाईल असं वाटलेला हा कोर्स वेळेच्या दृष्टीने फ़ारच हेक्टीक ठरला. घरी मुलींचं शाळा-कॉलेज, नव-याचे परदेश दौरे हे सगळंही त्यातच. अक्षरश: जीवतोड धावपळ झाली ती दीड वर्षं. पण कोर्स अत्यंत  इंटरेस्टींग होता यात वादच नाही. एकही लेक्चर बुडवू नये असं वाटायचं. तस्निम मेहतानी कोर्स डिझाईन करताना खूप विचार केला होता. मुंबईत अशा त-हेचा हा पहिलाच कोर्स होत होता त्यामुळे त्या दृष्टीनेही महत्व होतं. प्रोफ़ेशनल पद्धतीने, ब्रिटिश म्युझियममधे असलेल्या अशाच त-हेच्या कोर्सच्या अभ्यासक्रमावर बेतलेला होता. कोर्सची फ़ी ५० हजार, म्हणजे तशी तगडीच होती. बडोदा, जेएनयू, शांतीनिकेतन, बंगलोर, लंडन, अमेरिका सगळीकडून फ़ॅकल्टीज बोलावलेल्या होत्या. 
म्युझियममधला प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरला. या आधी कधीही इतक्या जवळून म्युझियम अनुभवलं नव्हतं. 
तर आता अचानक हातात आलेलं आर्ट जर्नल चाळत असताना त्या कोर्समधलं प्रत्येक लेक्चर आठवायला लागलं. 
कोर्स पूर्ण झाल्यावर त्याचा नेमका काय फ़ायदा झाला वगैरे सांगता यायचं नाही, कारण एकतर मला नव्याने कोणतीही करिअर सुरु करायची नव्हती. माझी कलाविषयक जाण एकंदरीत वाढावी इतकाच उद्देश हा कोर्स करण्यामागे होता. माझी ’चित्रभाषा’ सुधारायला याचा फ़ायदा निश्चित झाला असं आता म्हणता येतय.
तर आता जमेल तसे आर्ट जर्नलमधे नोंदवलेले म्युझियम डेज या ब्लॉगवर क्रॉनिकल करावे असा विचार करते आहे. जरा मजा..

Thursday, November 3, 2016

लख्ख

एखादा क्षण लख्ख दिसतो. त्याच्या आजूबाजूच्या सामान्य क्षणांच्या गर्दीतून तो उठून दिसतो, झळाळतो. नेमकं काय करायला हवं, काय नको याची जाणीव तो क्षण करुन देतो.  लखलखत्या माणकासारखा हा क्षण घट्ट जवळ पकडून ठेवायचा. पुढच्या ब-याच वर्षांची बेगमी करुन देणारा हा क्षण.

Thursday, October 20, 2016

दीड दिवस आणि पाऊण रात्र घालवूनही हातातलं काम संपलं नाही, शिवाय त्यात आणखी कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागले, सकाळी तर ते अजूनच वाढायचं चिन्ह दिसलं, स्ट्रेस आला तेव्हा सरळ उठले आणि लॅपटॉप घेऊन बाहेर पडले, अजून दोघी मैत्रीणी ज्या त्यांच्याही कामाच्या प्रेशरखाली वैतागल्या आहेत त्यांना जॉइन झाले. मग आम्ही तिघी मिळून जवळच्या मॉलमधे लंच केलं आणि मग एकत्र बसून आपापली कामं केली. सोबत गप्पा आणि चहा आणि गाणी. तिघींच्याही डोक्यावरचं कामाचं प्रेशर झटकन निघून गेलं.
फ़्रीलान्सिंग करताना कामाचं, स्वत:च्या वेळेचं कितीही प्रिय स्वातंत्र्य असलं तरी ऑफ़िसमधल्या कम्युनिटी शेअरिंगच्या फ़ायद्यांना पर्याय नाही हे लक्षात आलं.

Monday, October 17, 2016

मी एक स्वार्थी वाचक

वाचन आणि पुस्तके संदर्भातल्या एका ग्रूपवर  Why do you read? या प्रश्नाला वाचकांनी I can not leave without books पासून I' d go insane if i didn't पर्यंत उत्तरे दिलेली वाचली. आणि आपण वाचन या प्रक्रियेत माझ्यापुरते बरेच इव्हॉल्व झाल्याचं जाणवलं. कोणे एके काळी मी सुद्धा अशीच निरागस उत्तरे दिली असावीत. एकतर पुस्तक वाचनाशिवाय मी आरामात दिवसेंदिवस जगू शकते हे अनुभवाअंती लक्षात आलय. 
दुसरं त्यातून निर्भेळ आनंद, करमणूक मिळवण्याची माझी कपॅसिटीच काहीशी कमी झाल्याने जोवर वेगळं काहीतरी मिळत नाही तोवर मी हातातलं पुस्तक वाचतच नाही हे लक्षात आलय. त्यामुळे माझ्यापुरती वाचन ही एक अत्यंत स्वार्थी गोष्ट झालीय. आता हे ’वेगळं काहीतरी’ मिळण्याचा स्वार्थीपणा कोणता? तर ते म्हणजे जोवर ’मला आवडलं असतं अशा प्रकारचं लिहायला’ अशी प्रतिक्रिया माझ्या मनात सुरुवातीच्या काही पानांतच किंवा त्याही आधी ब्लर्ब वाचूनच  उमटत नाही किंवा ’माझ्या लिहिण्याच्या जतकुळीला मिळतं जुळतं’ असं वाटत नाही तोवर मी पुस्तकाची पानही उलटायच्या भानगडीत पडत नाही. थोडक्यात  माझ्या स्वत:च्या लेखनाला वाचनातून काहीतरी प्रेरणा मिळणं, ट्रीगर मिळणं, मला लिहावसं वाटायला लागणं मस्ट आहे. 

Tuesday, October 11, 2016

तीन महिन्यांच्या गॅपनंतर आज टाऊनला चक्कर झाली.
कमलनयन बजाज गॅलरी मधे शुभांगी चेतन या आर्टिस्टचे ’पोत’ (टेक्श्चर्स) नावाचे प्रदर्शन भरले आहे. पहिलेच आहे. ब्लॅक इन्क, थोडी ब्राऊन टीन्ट वापरुन झाडांच्या खोडाचा पोत तिने आपल्या सगळ्या पेंटींग्जमधे रंगवला होता. दिसायला चांगली होती, चित्रांना फ़्लो छान होता पण ’पोत’ मधे जे वैविध्य अपेक्षीत आहे ते नव्हते. वैयक्तिकरित्या मला झाडांच्या खोडांचे फ़ॅसिनेशन असले तरी खरखरीत, खडबडीत, मुलायम, रखरखीत, रेशमी, मऊ, दगडी अशा अनेक प्रकारचे "पोत" असू शकतात ते इथे नव्हते. अर्थात हा आर्टिस्टचा चॉईस झाला. पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे एकाही इमेजला ’स्पर्श’ करुन पहावासा वाटण्याजोगे टेक्स्चर कॅनव्हासला आणण्यात आर्टिस्ट कमी पडली. वेगळे टेक्निक वापरुन हे करता आले असते. पेंटींग्जमधे रंगलेपनातूनही जो पोत दिसतो, ्जाणवतो तो इथे नव्हता. हे फ़्लॅट होतं.
ठाणे स्कूल ऑफ़ आर्टची विद्यार्थिनी
रचना संसदचे सर आपल्या फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना घेऊन आले होते, छान वाटलं तो घोळका पाहून. फ़क्त ते प्रत्येक चित्र मुलांना ’समजावून’ सांगत होते. त्या ऐवजी आधी त्यांना चित्र पाहू देऊन तुम्हाला काय ’समजले’ विचारले असते तरी चाललं असतं असं वाटलं.

एनजिएमए मधे अल्काझी फ़ाउंडेशनचं आर्काइव खुलं केलं गेलं आहे आणि ते महान अनमोल आहे. प्रत्येक नाट्यप्रेमीनीच नाही, तर चित्रकला, सिनेमा, राजकारण, प्रवास, संगीत, नृत्य यात रस असणा-या प्रत्येकाने ते पहावं. अल्काझी हा माणूस शब्दश: एक संस्था आहे.
ओम शिवपुरी तरुणपणी ऎक्चुअली हॅन्डसम दिसायचा. सुधा शिवपुरी देखणी दिसायची. रोहिणी ओक (हत्तंगडी) तशीच दिसायची, नासिर, अमरिश पुरीला तरुण पाहिलेलं आठवत असल्याने ते काही फ़ार वेगळे नाही वाटले.

इंडियन कॉस्च्यूम्सची पुस्तकं, अल्काझींच्या नाटकांच्या सेट्सच्या मिनिएचए प्रतिकृती, त्यांचे कॉस्च्यूम्स, मराठी नाटकांच्या ऐतिहासिक संदर्भांचं पुस्तक, अल्काझींच्या थिएटर वर्कशॉप्सचे व्हिडिओज आणि शेकडो, हजारो कृष्णधवल देखणी छायाचित्रे.

अल्काझी टाइम्स हा तर अफ़लातून प्रकार, आर्ट आणि थिएटर टाईम्स हे एक काल्पनिक वर्तमानपत्र अल्काझी चालवत होते. गेल्या शतकापासूनच्या नाट्य, चित्रकला क्षेत्रापासून राजकारणापर्यंत असंख्य बातम्यांचं कोलाज भिंतींवर लावलेलं आहे. त्यात धुरंधरांचं निधन पासून पाकिस्तानचा हल्ला, केनेडीची हत्या पासून गांधीचं उपोषण.. अनेक बातम्या खरोखरीच्या वाचायला मिळतात.
सुलतान अकबर म्हणजे अकबर पदमसींचे कोण?
अल्काझी किती छान चित्रकारही होते. अनमोल डॉक्यूमेन्टेशन आहे हे प्रदर्शन.

हे प्रदर्शन पुन्हा पाहून त्यावर सविस्तर लिहायला हवं आहे.

बाकी तीन महिन्यांनंतर गेले आज टाऊनला. तो एक अनुभवच वाटला वेगळा. मरिन ड्राइव, त्यावरचा मावळता सूर्य, नरिमन पॉइन्ट, वरळी, हाजी अलीची स्कायलाईन पाहून नजरेवर गेले कित्येक दिवस ठळकपणे उमटलेली आल्बनी, न्यूयॉर्कच्या देखण्या नजा-यांची इम्प्रेशन्स फ़िकट झाली. आपली मुंबईही किती देखणी आहे.. असं झालं.


जादू

ही रात्र, हे चांदणं पुन्हा नसेल, ही जादू नसेल..
झाडांवरुन निथळणा-या सावल्या
बहार निघून जात आहे
पुन्हा परतून येणारे नाहीयेत हे काफ़िले बहारके, एकदाच पुकारतील तुला ते जायच्या आधी आणि मग कायमचे दिसेनासे होतील..
ही जादू अनुभवण्याचा हा एकच क्षण.. तो चिरकाल नाहीच

देव आनंद गातो आहे आर्तपणे, कदाचित स्वत:करताच. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जुवेल.


जे हवं ते मिळण्याचा आणि त्यातली जादू हरवून जाण्याचा क्षण हा अनेकदा एकच असतो..
ही नात्यातली मर्यादा.

तुम्हाला खूप लिहायचं असतं, वाचायचं असतं, इकडे तिकडे हिंडून काही काही बघायचं असतं पण एकच एक कोणततरी रटाळ पण अतिआवश्यक काम तुमचे पाय, हात, डोकं सगळं बांधून ठेवतं. ते पूर्णही होत नाही, अर्धवटही सोडता येत नाही. मग तुम्ही अतिआवश्यक काम तसंच ठेवून अत्यंत फ़ुटकळ टाईमपास स्क्रीनवर करत रहाता. अतिआवश्यक काम अशाने अजून अजून अजून लांबत चालले आहे हे लक्षात येतच एका क्षणी. त्यानंतर मग निव्वळ हताशा आणि कीबोर्डवर थडाथड राग काढत रहाणं.. इतकंच हातात रहातं.

पुन्हा आलमेलकर

आलमेलकरांचं काम मी आधी खूप पाहिलेलं नाही, एमजिएमएचं प्रदर्शन पहाताना पण समहाऊ हे आपण सारखं सारखं अनेकदा पाहिलय असं वाटत राहिलं. कदाचित त्यांचे गुरु बेन्द्रे, त्यांची चित्रं मला खूपच आवडतात. ती अनेकदा पाहिलेली आहेत. आणि आलमेलकरांच्या पठडीतले दलाल आणि इतर बरेच आहेत. शिवाय आलमेलकर ज्या आदिवासी चित्रांकरता सर्वात जास्त फ़ेमस आहेत ती किंवा तशी इतक्यांदा कॅलेंडर्सवर, दिवाळी अंकांवर, इलस्ट्रेशन्समधे, घरांच्या भिंतीवर सजावटीकरता लावलेल्या फ़्रेम्सवर पाहिली आहेत त्यामुळे हा देजावू.
रेषा डौलदार आहे, पण त्यात स्वैर रेषेतली मजा मिसिंग वाटते. रंग जरा जास्तच झळझळीत त्यामुळे कृत्रिमतेकडे, डेकोरिटवपणाकडे झुकणारे वाटले कॅनव्हास. आदिवासी स्त्रियांच्या कपड्या, दागिन्यांमधेही वास्तवता मिसिंग आहे. सगळ्या एकजात दागिन्यांनी नटलेल्या. बर तेही दगडांचे किंवा नैसर्गिक बिया, मण्यांचे दागिने नाहीत, चक्क पुतळ्यांच्या माळांसारखे हार गळ्यात. जरा जास्तच सधन आदिवासी वाटत होते. रोमॅन्टीक, काव्यमय आदिवासी जीवन. स्टायलेझशनचा प्रभाव. बेन्द्रेंवरही होताच तो प्रभाव.
देवदत्तची चित्रं मला खूप आवडतात, पण त्याच्या चित्रांवर असलेला युरोपियन प्रभाव- हे आपलं पॅलेट नाही. स्किन कलर वगैरे..हे युरोपियन पण तिथे शिकल्यामुळे त्याच्यावर तो प्रभाव उमटला. त्यातून तो बाहेर पडत नाहिये.

साच्यामधे का अडकतात आर्टिस्ट? उदा. शशिकांत धोत्रे.
खरं तर त्याची दगडफ़ोडणार्यांची पार्श्वभूमी. मग त्याला का वाटू नये त्यांचं जगणं कॅनव्हासवर उतरवावं असं?
जसं पोटॅटो इटर्सचं जगणं व्हॅन गॉघला उतरवणं महत्वाचं वाटलं तसं?
कोळशाच्या खाणीतलं वातावरण आपल्या इन्स्टॉलेशन्समधून मांडणं प्रभाकर पाचपुतेला महत्वाचं वाटलं तसं?

डिझाईनमधला, आर्टमधला, व्यक्तिमत्वातला साधेपणा दुर्लक्षिला जातो. त्यात आकर्षून घेणारे कोणतेच एलेमेंनट्स नसतात. साधेपणा म्हणजे बेंगरुळपणा, आळशीपणा, शॉर्टकट असाही समज होतो. 
कंगोरे, नक्षी, रंगाची उधळण, वैविध्य हे डिझाईनला गुढपणा आणतात, खोली आणतात. 
निदान तसा आभास निर्माण करण्यात यशस्वी होतात. 

निळं, स्वच्छ, एकरंगी आभाळ नजरेला कंटाळा आणतं. पण रोज सकाळ संध्याकाळ रंगांची उधळण करणारं आकाश कितीही वेळा पाहून मन भरत नाही. 

असं असताना साधेपणाची ओढ का वाटावी मनाला? 

मिनीमालिझममधलं सौंदर्य ज्याला उमगलं त्याला सगळं उमगलं. जगणं उमगलं. 
खरंखुरं जगताना सोबत कशाचीही गरज वाटू नये. 
सोबत असावी फ़क्त आपल्या समृद्ध व्यक्तिमत्वाची. ज्यात काहीही अडगळ शिल्लक नाही, कोपरे लख्ख आहेत, त्यात राहणं हे खरं जगणं.

Monday, October 10, 2016

कलेमधे काही जेनेरिक आर्ट फ़ॉर्म्स असतात. उदा. नाग मंडल किंवा ट्री ऑफ़ लाईफ़, किंवा इतरही अनेक. आदिवासी कला या मोटिफ़्सना बेस धरुन विकसित होते.
आजकाल अनेक शहरी कलाकार- पेंटर्स किंवा दागिने बनवणारे, आपल्या कलाकृतींमधे हे मोटिफ़्स वापरतात. जसेच्या तसे. काही मोजके कलाकार या मोटिफ़्सना स्वत:च्या वेगळ्या कल्पकतेने वेगळ्या स्वरुपात खुलवतात.  उदा. के. जि. सुब्रमण्यन, गणेश पाईन. ते मुळच्या आदिवासी मोटिफ़्समधे आपल्या काही वेगळ्या मटेरियल, फ़ॉर्म, कन्सेप्टमुळे वेगळेपणा आणतात.
पण इतर अनेक जण असतात ते आदिवासी मोटिफ़्स जशीच्या तशी कॉपी करतात.
आणि म्हणतात हा तर जेनेरिक फ़ॉर्म आहे.

एक आर्ट हिस्टोरियन या नात्याने यात माझा काय टेक असू शकतो?

मुळात आदिवासींनी निसर्गातून हे मोटिफ़्स उचलले आणि आपल्या कलेत आणले तेव्हा त्यात स्वत:चा डिझाईन सेन्स, बुद्धी, कल्पकता ओतली. त्यातूनच हे मोटीफ़ तयार झाले. हे जेनेरिक मोटीफ़ प्रत्येक जमातीतल्या आदिवासींचे वेगळे, त्यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेले आहेत. त्यात त्यांनी आपली स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण कला ओतली आहे, त्यांच्या स्वत:च्या शैलीत ते मोटीफ़ विकसित झाले आहेत.
उदा. ट्री ऑफ़ लाईफ़ मोटीफ़. प्रत्येक आदिवासी जमातींमधला ट्री ऑफ़ लाईफ़ वेगळा आहे. त्या जमातीच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्सनी तो स्पष्ट वेगळा ओळखता येतो.
उदा. हा गोंड जीवनवृक्ष, हा सावोरी जीवनवृक्ष, हा वारली जीवनवृक्ष, हा मधुबनी.. इत्यादी.

एका जेनेरिक मोटीफ़पासून या प्रत्येकानी स्फ़ुर्ती घेऊन आपला स्वतंत्र जीवनवृक्ष विकसित केला. 

पण शहरी कलाकार काय करतात? ते हाच मोटीफ़ आपल्या कलाकृतींमधे उदा. पेंटींग, दागिन्यांमधे वापरताना जसाच्या तसा वापरतात. स्वत:ची काहीही वेगळी वैशिष्ट्य त्या डीझाइनमधे घालण्याचे कष्ट घेत नाहीत, स्वत:ची वेगळी कन्सेप्ट विकसित करत नाहीत.
सगळी नैतिकता धाब्यावर बसवून ते हे करतात. आणि म्हणतात सगळेच करतात.

सगळेच तसं करतात, म्हणून मीही.
या विधानांना काय अर्थ असतो नेमका? 

आणि मग तुमच्या ग्राहकांचं काय? ते  तुम्हाला डिझाईनच्या एक्स्क्लुजिविटीचे पैसे देतात, भरमसाठ.
त्यांची फ़सवणूक नाही का या प्रकारात? फ़ार तर स्किलचे पैसे लावा. डिझाईन, फ़ॉर्म किंवा कन्सेप्टचे कसे लावता?
शिवाय मग तुम्हाला आर्टिस्ट का म्हणायचे? 



निसर्गातल्या नैसर्गिक ध्वनींमधून लोकसंगीत बनतं.  लोकसंगिताच्या त्या धूनपासून एखादा कल्पक संगीतकार, काही संस्कार करुन गाणं बनवतो. ते योग्यच असतं. पण मग त्या गाण्यावरुन बाकी संगीतकार आपापल्या भाषेत जशीच्या तशी गाणी बनवतात. ते चूक असतं.
पण कोणी आक्षेप घेतला तर ते म्हणतात हे मुळातलं लोकसंगीत. अरे पण मग त्या संगितकाराने आपला वेगळा ठसा उमटवून धून बनवली तसं तुम्ही करायचे कष्ट का घेतले नाहीत?

जेनेरिक मोटीफ़्सच्या बाबतीत आर्टिस्टने स्वत:ची काहीतरी वेगळी कल्पकता, कन्सेप्ट वापरायलाच हवी.
पिरियड

Wednesday, May 11, 2016

उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस...

जॉगर्सपार्कच्या बाहेरच्या गुलमोहोराची लाल फ़ूले लगडलेली एक फ़ांदी सप्पाकन कापून रस्त्याच्या मधोमध टाकून दिलेली. अशक्य शहारा येतो अंगावर. पाऊस येईल आता लवकरच तेव्हा त्याच्या तयारीची ही मुन्सिपाल्टीची लगबग.
ब-यापैकी तरुण ्वयातला एक्स बॉस हार्ट अ‍ॅटेकने दोन दिवसांपूर्वी गेला ही बातमी मनात नेमकी तेव्हाच घोळत असते,
मुंबईत घामाच्या धारा लागलेल्या असताना कुठे कुठे, पुणे, नाशीक वगैरे ठिकाणी पावसाच्या सरीने वातावरण धुंदफ़ुंद झाल्याची फ़ेसबुक स्टेटसे चीड आणतात.
कोंदलेल्या हवेत धड कामही झालेलं नसतं दिवसभर.
उन्हाळ्याचे हे शेवटचे दिवस नकोसे वाटतात. आंब्यांची क्रेझ ओसरलेली, लाल-पिवळ्या-जांभळ्या-निळ्या-गुलाबी फ़ुलांचे बहर डोळ्यांना सुखावून थकलेले असतात. आणि उकाडा ऐन भरात.
सरता उन्हाळा..

Sunday, May 1, 2016

उन्हाळी दुपार

लखलखत्या उन्हामधे खिडकीबाहेर पहाताना तंद्री लागते. हिरव्या पोपटी लहानशा पानांच्या ढिगावर सोनेरी पिवळी बुंदक्यांसारखी सजलेली पेल्टोफ़ोरमची फ़ुले वा-याच्या झुळकीत इकडुन तिकडे डोलतात आणि मग टपटपत खाली उड्या मारतात. बिल्डिंगच्या आवारात पिवळ्या फ़ुलांच्या गालीच्याची गच्चदाट पखरण होते दिवसभर. पार्क केलेल्या गाड्यांच्या टपावरही पिवळे बुंदके चिकटवल्यासारखे. हे यलो पेल्टोफ़ोरम इन्स्टॉलेशन चैत्राचं. मांडीवरचा लॅपटॉप स्तब्ध होतो, काय लिहायचं ते कधीच मनातून गळून पडलय. जरा कान दिला तर पेल्टोफ़ोरमचं फ़ुल गाडीच्या टपावर पडतानाचा अलगद आवाजही ऐकू येईल याची खात्री वाटावी इतकी निरव स्तब्धता.
उन्हाळाच्या अशा  दुपारच्या वेळा खतरनाक.
रविवारी संजय गांधी नॅशनल पार्कमधे प्रेस्ड फ़्लॉवर वर्कशॉपला गेले होते. बॉटनीची स्टुंडन्ट असल्याने मला हर्बेरियम्स कशी करायची माहित आहे. शिकत असताना बोटॅनिकल एक्सकर्शन्सना गेल्यावर वेगवेगळी फ़ुलं, पानं प्रेस करुन सुकवायचं टेक्निकही माहित झालेलं. नंतर बॉटनीशी संबंध सुटला पण कशी माहित नाही, फ़ुलं सुकवायची सवय कायम राहिली. मधून मधून बुकमार्क, ग्रिटींग करुन मित्र-मैत्रिणींना देण्याकरता त्यांचा उपयोग व्हायचा. पण हा उत्साह फ़ार कमी वेळा येतो. या वर्कशॉपमधे सुकवलेल्या फ़ुलांचं आणखी काही वेगळं, सोपं करायला शिकवतील असं वाटलेलं. तर ते तसं काही फ़ार वेगळं मिळालं नाही शिकायला पण त्या निमित्ताने इतक्या सकाळी (साडेसात वाजता) बोरिवलीच्या जंगलात जायचा अनुभव खूप वर्षांनंतर घेतला. काही वर्षांपूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नेचर ट्रेल्सना खूप वेळा यायचे. लोकं मस्त दुर्बिणी वगैरे घेऊन बर्ड वॉचिंग करत होते, सायकली फ़िरवत होते, व्यायाम चालू होते, काहीजण भल्या पहाटेच जंगलात खोलवर फ़िरुन आता परतत होते. मस्त, उत्साही वातावरण. सगळ्यात सुंदर गुलमोहोर, पळस, काटेसावर, सोनमोहोर, बहावा, आसूपालवचे फ़ुलांनी लगडलेले वृक्ष. अहाहा..  हावरटासारखी पुन्हा खाली गळून पडलेली फ़ुलं, शेंगा, बिया गोळा करुन घेतल्यात. आता वर्कशॉपमधे शिकवलेल्या जरा वेगळ्या टेक्निकने पुन्हा काहीतरी करुन बघायला हवा. अंगात नवा उत्साह भरण्याची निसर्गाची शक्ती अफ़ाट आहे. 

Tuesday, April 26, 2016

लहान वयात दोनदा एव्हरेस्ट आणि गौरिशंकर चढून गेलेल्या संतोष यादव यांची एक अनौपचारिक मुलाखत वाचत होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांनी माउंटेनिअरिंगमधून ब्रेक घेतला. आता त्या हिमालयात एका गावात लहान मुलांकरता शाळा भरवतात. अगदी साध्या सुध्या आहेत संतोषजी. कोपरापर्यंत ब्लाऊज, सुती साडी, तिचा डोक्यावरुन हरयाणवी पद्धतीने घेतलेला पदर, कपाळावर पिंजरेचं कुंकू वगैरे असं मुलाखतीत लिहिलेलं.
तर त्या सांगत होत्या की मुलांना पर्यावरणाचं रक्षण करायला शिकवायचं असेल तर आधी निसर्गाशी, हिमालयाशी नातं जोडणं शिकवायला हवं. आणि त्याकरता त्यांना स्वत:शी, समाजाशी, नात्यांच्या परिघाशी पक्क बांधणं गरजेचं आहे. आता हे कसं करायचं याचा बराच विचार, प्रयोग केल्यावर  लक्षात आलं की त्याकरता त्यांना आपल्या संस्कृतिशी, धर्माशी जोडून ठेवायला हवं. त्यांच्या मनाला, शरिराला शिस्त शिकवायला हवी. आजच्या काळात, जिथे मोहाची, लक्ष विचलीत होण्याची साधनं मुलांच्या सतत अवती भवती असतात तिथे हे साधता येणं अत्यंत मुश्किल. पण जर धर्मातल्या, संस्कृतीतल्या काही रिच्युअल्स, उदा. पूजापाठ, ध्यानधारणा वगैरे.. त्यांच्या अंगात भिनवल्या गेल्या, तर आपोआप त्यांच्या दिनक्रमाला शिस्त लागते. मनाला शिस्त लागते. ध्यानधारणेमुळे ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण वाढते आणि मग स्टॅमिना, उर्जा वाढते असे बरेच फ़ायदेही होतात. साधारण पारंपरिक हिंदू घरांमधे या रिच्युअल्स रेग्युलर पाळल्या जातात, पण शहरी मुलांना ते शिकवणार घरात कोणी नसतं. म्हणून मग कधीही उठा, कधीही, कसंही जेवा, कधीही झोपा असे प्रकार लहान वयापासून सुरु होतात आणि मग बेशिस्त अंगात भिनते, जी आपल्या आयुष्यातही उतरते.
आता यातलं योग्य-अयोग्य इत्यादीबद्दल वेगळी मतं असू शकतातच.

बाकी धार्मिकता वगैरे जाऊदे. पण मला रिच्युअल्सचं इन जनरल महत्व मात्र हल्ली मनापासुन पटायला लागलय. कर्मकांड शब्दातला धार्मिक संदर्भ बाजूला ठेवला तरी रोजच्या जगण्यात इतरही असतातच ती.
अशा रिच्युअल्स करण्यामुळे आयुष्य सोपं आणि आपल्या ताब्यातलं होतं. ठराविक गोष्टी ठराविक वेळेत उरकल्या एकदा की मग बाकी गोष्टी करायला दिवस मोकळा. गरजेच्या गोष्टीच झाल्या नाहीत असा ताण मग मनावर रहात नाही.
पूर्वी मी ट्रेक, पिकनिकवर गेल्यावरही सकाळी मेडिटेशन वगैरे करणं न चुकवणा-यांचा वैताग करायचे. पण आता आपापल्या दिनक्रमानुसार, गरजेनुसार काही रिच्युअल्स आपल्यात भिनवणं आत्यंतिक गरजेचं आहे हे मला कळलय. मग ते हेल्थ रुटीन असो, ब्यूटी रेजिम असो की वर्क शेड्यूल. रात्री झोपायच्या आधी उद्याच्या कामांची यादी करणे, सकाळी उठल्यावर योगासनं, ब्रिदिंग एक्सरसाईज करणे, वॉक घेणे, ठराविक वेळीच आंघोळ करणे, जेवणे पासून अगदी आठवड्यातून अमुक दिवशी केसांना तेल लावणे, पेडिक्युअर करणे अशी कामे रिच्युअल म्हणून अंगात भिनवून घेतली की निदान अशा कामांनाही (माझ्यासारखी) रिमाइंन्डर्स लावायची गरज रहात नाही.
मात्र रुटीनचं रिच्युअल होण्याकरता कठोर शिस्तीला पर्याय नाहीच. इथे ती मुळातच अंगात नसल्याने हे सगळं अधुन मधुन बारगळतं. अजून पूर्वीपासून सुरुवात करायला हवी होती, जरा आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं या बाबतीत तरी ऐकायला हवं होतं असं वाटत रहातं.
आणि आता यात अजून एक विदारक गंमत अशी की स्वत:त रिच्युअल्स भिनवायचं महत्व कळायलाच इतकं आयुष्य उलटलं, मुलींचं काय? त्यांना कसं हे रिच्युअल्सचं महत्व समजवायचं? ते शक्य नाहीच व्हायचं आमच्याने. आम्हीच मुळात रात्री दीड दोननंतर झोपणार, मग सकाळची कामं दुपारी करणार.. शेड्यूलच्या धज्जियां स्वहस्ते रोज उडवणार.. मुलींना स्वत:हून लवकर अक्कल येवो.
तर आता संतोष यादवजींच्या शाळेमधे या वयातही भरती होता येतय का याची चौकशी करावी असा विचार मनात येतोय.


एकेक आठवडा असा येतो की तो मध्यावर आलेला असताना लक्षात येतं सगळ्या ठरवलेल्या शेड्यूलच्या धज्जियां उडताहेत. एकही काम ठरवल्यानुसार होत नाहीये. रोजची कामंही मागे पडताहेत. अगदी रविवारचे पेपरही गुरुवारपर्यंत वाचून झालेले नसतात. ठरवलेल्यापैकी एकही कामाचा फोन झाला नाही, लिहून झालेलं नाही आणि आता ते अगदी गळ्याशी आलय. यामागे आपलीच चालढकल, भलत्याच गोष्टींमधे रमून जाणं, फ़ेसबुकवर रेंगाळणं, मित्रमैत्रीणीसोबतचा फ़ुकट टाईमपास, फोनवरची लांबलेली गॉसिप्स हे सगळं असल्याचं पक्कच ठाऊक असल्याने दोष कुणावर ढकलताही येत नसतो. 
सगळ्यात दारुण म्हणजे हे असे आठवडेच जास्त असतात याची जाणीव डायरीची मागची पानं उलटल्यावर लक्षात येणं. साधारण बुधवार-गुरवारच्या सगळ्याच एन्ट्र्या या अशा स्वत:ला कोसणा-या. 
कितीही टाईम मॅनेजमेन्टच्या टीप्स वाचा, डिक्लटरिंग, मिनिमलिझमचे कॉलम्स लिहा.. मनाला लगाम घालण्याची बाळबोध पुरातन शिकवण अंगी रुजत नाही तोवर सगळं व्यर्थ आहे. 

Monday, April 25, 2016

पॅटर्नच्या अलीकडे पलीकडे..

पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे तुम्हाला हलता येत नाही. म्हणजे तुमचं जगणं, वाचणं, बोलणं, व्यक्त होणं, लिहिणं अगदी वेगळं वागणंही पॅटर्नच्या आसपासच. पॅटर्न रक्तात गोंदवलेला असतो. डिएनएच्या पत्र्यावर ठोकलेला असतो.
आपल्या जन्माच्याही अगोदरपासून कित्येक जन्मलेल्यांनी त्यांच्या जगण्यातून ठरवलेला पॅटर्न.
पॅटर्नच्या जरा इकडे किंवा जरा तिकडे बरेच जण जातात. काही मोजके फ़ारच इकडे किंवा फ़ारच तिकडे सरकत जातात. दुस-या पॅटर्नच्या जगण्याकडे आकर्षित होऊन, त्यांच्या जवळ, कधी कधी थेट त्यांच्या परिघातच घुसून.
त्यातले काही नंतर व्यक्त होतात लिहिण्यातून, बोलण्यातून तेव्हा आपल्यापर्यंत त्यांचं असं खूप इकडे तिकडे सरकून वागलेलं, जगलेलं पोचतं.
अर्थात व्यक्त होताना, व्यक्त होण्याकरता त्यांना पुन्हा आपल्या आधीच्या पॅटर्नच्याच आसपास येऊन पोचावं लागतच, तरंच आपलं पॅटर्नपासून फ़टकलेलं जगणं पॅटर्नच्या परिघात जगणा-यांपर्यंत पोचवण्यात यश मिळतं. त्यांना याची का गरज वाटावी? म्हणजे त्यांना खास याकरता पुन्हा पॅटर्नच्या इतक्या जवळ यावसं वाटावं हे जरासं केविलवाणच. आधीचा सगळा प्रयास कशाकरता होता मग?
पण निदान त्यामुळे आपल्याला वेगळं जगलेलं, वागलेलं पहायला मिळतं.
काही मुळातच आपल्यापेक्षा वेगळ्या पॅटर्नमधे जगणारी असतात. ते त्यांच्या पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे न हलता जगतात. त्यांच्यापैकी काहीजण खूपच अलीकडे पलीकडे जाऊन आपल्या पॅटर्नच्या अगदी जवळ, अगदी आपल्या परिघातच येऊन जगायला लागतात. आपल्याला सुरुवातीला ते वेगळं वाटतं पण त्यांच्या परिघातून आपल्या परिघापर्यंत येईस्तोवर त्यांच्या वेगळ्या पॅटर्नचे कानेकंगोरे घासुन, ठोकून आपल्या पॅटर्नमधे फ़िट बसण्याजोगेच झालेले असतात. अगदी त्यांच्या अंगावरचे वेगळे ठिपके, डिझाईनही फ़िकट होऊन पुसलेले आणि इव्होल्यूशनच्या थियरीनुसार या बदललेल्या पॅटर्नच्या नव्या डिझाईनचा अंगरखा त्यांच्या अंगावर चढायला सुरुवातही.

पॅटर्नमधल्यांची अशी ये-जा सारखी चालूच असते. एका पॅटर्नवाल्यांना दुस-या पॅटर्नवाल्यांच्याअ ख-या जगण्या वागण्याची फ़ारशी जेन्युईन कल्पना येऊच नये या हेतूने सगळी रचना कशी पॅटर्नप्रूफ़.  

Sunday, April 24, 2016

मुंबई मोमेन्ट-एक

भर दुपारचं मुंबईतलं रणरणतं उन्ह. आजचा शनिवार बरेच दिवस राहून गेलेली टाऊनमधली काही महत्वाची आर्ट एक्झिबिशन्स बघण्याचा. चालतच जायचं हा अट्टहास भारी पडतोय का असं या कोसळत्या उन्हामधे पावलं उचलताना क्षणोक्षणी वाटतय. पण मजाही येतेय. 

एनजिएमएमधे सौंदर्यवादी, फ़िगरेटीव परंपरेतले आलमेलकर बघून झाल्यावर वरच्या डोममधे भरलेलं प्रभाकर पाचपुतेचं विदर्भातल्या कोळशांच्या खाणींमुळे बदललेल्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य असलेलं इन्स्टॉलेशन बघणं हा किती टोकाचा, वेगळा अनुभव. एक नॉस्टेल्जियाची सुनहरी सैर आणि दुसरी जळजळीत वर्तमान. आलमेलकरांची स्ट्रॉबोर्डवरची लयबद्ध आदिवासी जीवन चित्रित करणारी आल्हाददायक स्केचेस, कॅनव्हासवरची वॉटरकलर्स, टेम्पेरा..  त्यात त्यांच्या जगण्यातलं वास्तव फ़ारसं आलेलं नाही, आलं असलंच तर आकर्षक, निर्भर, काव्यमय जगण्याच्या टिपिकल साच्यातलंच. पाचपुतेने डोमच्या भिंतींवर कोळशाने चितारलेली स्वैर स्केचेस, मातीच्या जमिनीवरचे तडे, खाणींमुळे पडलेली विवरं, टोळधाडी, खाणकामगारांचं अधांतरी, असुरक्षित जगणं.. चित्रकला निदान इतका प्रवास करुन वास्तवापर्यंत पोचते आहे हे दिलासादायक वाटलं.
क्लार्क हाऊसमधलं सचिन बोंडेचं प्रदर्शन, तेलसाम्राज्याचा राजकीय, सांस्कृतिक आढावा हेही याच प्रकारातलं. 
केमोल्डमधे डेसमन्ड लाझारेस. मायग्रेशनची त्याची वैयक्तिक कहाणी..

आर्टीस्ट्सचं काम पाहून झाल्यावर नेहमी मनात येणारा सनातन प्रश्न. पोचलाय का हा माणूस पूर्णपणे आपल्यापर्यंत त्याच्या कलेसोबत? कशाला पोचायला हव खरं तर? कथेतून, कादंबरीतून लेखकातला माणूस कुठे पोचतो प्रत्येकवेळी? मग चित्रकाराच्या मनातल्या उर्मी, स्पंदनं कॅनव्हासवरुन पोचायला हवीत हा मनाचा आग्रह का आहे माझ्या? आर्ट एक्झिबिशन पाहून झाल्यावर आर्टिस्टशी बोलल्याशिवाय, त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. त्याचा प्रवास आणि माझ प्रवास हा एका कोणत्या तरी बिंदूला एकमेकांना छेदायला हवा. त्या क्षणीक नजरानजरीतून जे समजतं ते अलौकिक असतं हे मात्र खरं.

वेवर्ड अ‍ॅन्ड वाईजमधून जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जेफ़ डायरचं द सर्च घेतलय. त्याचं जेफ़ इन व्हेनिस आवडलेलं. बघू हे कसं आहे. या दुकानात आख्खा दिवस घालवायचा आहे एकदा. किंवा अनेकदा.