Monday, October 17, 2016

मी एक स्वार्थी वाचक

वाचन आणि पुस्तके संदर्भातल्या एका ग्रूपवर  Why do you read? या प्रश्नाला वाचकांनी I can not leave without books पासून I' d go insane if i didn't पर्यंत उत्तरे दिलेली वाचली. आणि आपण वाचन या प्रक्रियेत माझ्यापुरते बरेच इव्हॉल्व झाल्याचं जाणवलं. कोणे एके काळी मी सुद्धा अशीच निरागस उत्तरे दिली असावीत. एकतर पुस्तक वाचनाशिवाय मी आरामात दिवसेंदिवस जगू शकते हे अनुभवाअंती लक्षात आलय. 
दुसरं त्यातून निर्भेळ आनंद, करमणूक मिळवण्याची माझी कपॅसिटीच काहीशी कमी झाल्याने जोवर वेगळं काहीतरी मिळत नाही तोवर मी हातातलं पुस्तक वाचतच नाही हे लक्षात आलय. त्यामुळे माझ्यापुरती वाचन ही एक अत्यंत स्वार्थी गोष्ट झालीय. आता हे ’वेगळं काहीतरी’ मिळण्याचा स्वार्थीपणा कोणता? तर ते म्हणजे जोवर ’मला आवडलं असतं अशा प्रकारचं लिहायला’ अशी प्रतिक्रिया माझ्या मनात सुरुवातीच्या काही पानांतच किंवा त्याही आधी ब्लर्ब वाचूनच  उमटत नाही किंवा ’माझ्या लिहिण्याच्या जतकुळीला मिळतं जुळतं’ असं वाटत नाही तोवर मी पुस्तकाची पानही उलटायच्या भानगडीत पडत नाही. थोडक्यात  माझ्या स्वत:च्या लेखनाला वाचनातून काहीतरी प्रेरणा मिळणं, ट्रीगर मिळणं, मला लिहावसं वाटायला लागणं मस्ट आहे. 

1 comment:

  1. Interesting. मी अजूनतरी हा निकष - निदान बुद्ध्या तरी - ठरवलेला नाही, वाचायचं की नाही हे ठरवण्यासाठी. पण या निकषावर मी लेखनाचं बरंवाईटपण मात्र ठरवत आलेली आहे! म्हणजे - अमुक एक वाचून मला काहीतरी - मग भले ती प्रतिक्रिया का असेना ताबडतोबीची, किंवा अजून काही मला म्हणावंसं वाटलेलं, काहीतरी - लिहावंसं वाटलं; म्हणजे हे काहीतरी जोरकस लेखन आहे - असं मी मानत आले आहे. मजेशीर आहे हे. नि हे आतापर्यंत माझ्या लक्ष्यात आलेलं नव्हतं. आभार!

    ReplyDelete